प्रेस मीडिया वृत्तसेवा :
इस्लामपूर : इकबाल पीरज़ादे :
आटपाडी तालुक्या पाटोपाठ, तासगाव तालुक्याची समन्यायी पाणी वाटपाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आल्याची माहीती श्रमिक मुक्ती दलाचे संस्थापक, १३ दुष्काळी पाणी चळवळीचे प्रणेते डॉ.भारत पाटणकर यांनी दिली .
तासगांव तालुक्यांमधील सर्व गावांमधल्या सर्व कुटुंबांना समन्यायी पद्धतीने शेतीसाठी पाणी देण्याची फेर आखणी चालू आहे. या फेर आखणीची प्रक्रिया पुढे नेण्यासाठी कार्यकारी अभियंता ताकारी आणि त्यांचे इतर संबंधित अधिकारी व श्रमिक मुक्ती दल-पाणी संघर्ष चळवळीचे नेते डॉ . भारत पाटणकर,श्रमिक मुक्ती दल - पाणी चळवळीचे इतर प्रतिनिधी यांची नुकतीच बैठक झाली.
या बैठकीस जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता राजन डवरी, उपविभागीय अभियंता एस बी महाजन, उपविभागीय अभियंता एस.एन नाईक , शाखाधिकारी व्ही . एस कांबळे , शाखाधिकारी प्रशांत पाटील, पाणी संघर्ष चळवळ आणि श्रमिक मुक्ती दलाचे आटपाडी तालुक्याचे नेते आनंदरावबापु पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश महासचिव आटपाडीचे सादिक खाटीक , श्रमिक मुक्ती दलाचे सर्वश्री, सुधीर नलावडे, प्रा . वासुदेव गुरव, ॲड. कृष्णा पाटील, समीर कोळी, शेतकरी कामगार पक्ष मेंढपाळ आर्मीचे अर्जून थोरात, पांडुरंग जाधव, अजय शिंदे, स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे बाबासाहेब पाटणे, बळीराजा संघटनेचे शशिकांत डांगे, संभाजी ब्रिगेडचे अमोल कदम, विजय पाटील, काँग्रेस आयचे तासगांव शहर अध्यक्ष शरद शेळके, भिवघाट येथील सामाजीक कार्यकर्ते भास्करराव पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते . तासगांव विश्रामगृहावर सदरची महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली .
या बैठकीत तासगाव तालुक्यामधील ७१ गावांपैकी ज्या बारा गावांचा शेतीला पाणी देणाऱ्या कोणत्याही योजनेत समावेश नाही. त्यांना समन्यायी पद्धतीने पाणी देण्यासाठी योजना करून त्यांची अंदाजपत्रके आणि आराखडे दोन महिन्यात तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला.
या गावांमध्ये कचरेवाडी, विजयनगर, धोंडेवाडी, किनरवाडी, नरसेवाडी, यमगरवाडी, दहिवडी, डोंगरसोनी, वायफळे, बिरणवाडी, लोकरेवाडी, आणि जरंडी या गावांचा समावेश आहे. या बरोबरच ज्या गावांमधील सर्व कुटुंबांना पाणी देण्यासाठी आवश्यक तेवढे पाणी पुरवण्याची मूळ आराखड्यात तरतूद नाही. अशाही गावांना पाणी देण्यासंबंधी नियोजन आराखडा करण्याचे ठरले. मूळ आराखड्याप्रमाणे सर्व कुटुंबांना देण्यासाठी पुरेसे पाणी उपलब्ध नसणारी गावे. नागाव ( निमणी ), तासगाव, कुमठे, धुळगाव, कौलगे, सावळज, सिद्धेवाडी, नागेवाडी, वडगाव, गव्हाण, पेड, मांजर्डे, मोराळे, शिरगाव (कवठे), निमणी, नेहरूनगर, जुळेवाडी अशी आहेत. या १८ गावांचाही फेर आराखडा येत्या दोन महिन्यात करण्याचे ठरले. सर्व कुटुंबांना पाणी देण्यासाठी आवश्यक पाणी जरी तालुक्यातील उरलेल्या गावामध्ये दिले जाणार असले तरी ते सर्व कुटुंबापर्यंत पोहोचण्याचा आराखडा मूळ नियोजनात नसल्यामुळे, अशा गावात सुद्धा फेर आराखडा करण्याचा निर्णय झाला. यासाठी नवीन उपयोजना करण्यात येणार आहेत.
या दृष्टीने नव्या योजना खालील प्रमाणे आखण्यात आल्या आहेत. सुळेवाडी उपसा सिंचन योजना. गोरेवाडी डावा कालवा बंदिस्त नलिका वितरण प्रणाली. नागाव(निमणी) उपसा सिंचन योजना. वासुंबे-तासगाव उपसा सिंचन योजना. कुमठे- धुळगाव बंदिस्त नलिका वितरण योजना. गव्हाण उपसा सिंचन योजना भाग-२. पेड- मांजर्डे-मोराळे बंदिस्त नलिका वितरण योजना. सिद्धेवाडी-जरंडी-सावळज-कौलगे उपसा सिंचन योजना. जुळेवाडी उपसा सिंचन योजना. शिरगाव कवठे-निमणी-नेहरू नगर उपसा सिंचन योजना. या आहेत.
येत्या ७ डिसेंबर रोजी पानमळेवाडी, यमगरवाडी आणि तासगाव या गावातील निवडक शेतकऱ्यांना फेर आखणीबाबत माहिती देऊन तासगांव येथे पहिले चर्चा-शिबिर घेण्याचे ठरले आहे.