लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या कारवाईने उडाली मोठी खळब
प्रेस मीडिया वृत्तसेवा :
इचलकरंजी / प्रतिनिधी
इचलकरंजी नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांबाबत कामबंद आंदोलन सुरु केले आहे. असे असतानाच आज मंगळवारी याच पालिकेतील नगररचना विभागातील अभियंता बबन खोत व त्याचा पंटर किरण कोकाटे या दोघांना २० हजारांची लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.या कारवाईने पालिका आवारात मोठी खळबळ उडाली आहे.
इचलकरंजी नगरपालिकेतील कारभा-यांचा भ्रष्ट कारभार हा सातत्याने चर्चेत असतो.त्यात पदाधिकारी व प्रशासन यांच्यामध्ये समन्वय नसल्याने शहरातील मालमत्ताधारकांना मुलभूत नागरी सुविधा मिळत नसल्याचा आरोप शहरवासियां मधून होत असतो.असे असतानाच शहरातील एका व्यक्तीने गुंठेवारीचे प्रकरण मार्गी लागण्यासाठी इचलकरंजी नगरपालिकेतील नगररचना विभागाकडे आवश्यक ती सर्व कागदपत्रे सुपूर्द केली होती. मात्र ,यासाठी संबंधित व्यक्तीकडून सुमारे २५ हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. यामध्ये तडजोडीअंती २० हजार रुपये देण्याचे ठरले होते. त्यानुसार आज मंगळवारी पंटर किरण कोकाटे याच्या माध्यमातून ही रक्कम अभियंता बबन खोत हे स्विकारणार होते. याबाबतची तक्रार संबंधित व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे केली होती. त्यानुसार आज मंगळवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास नगरपालिकेतील नगररचना विभागाच्या आवारातच सुमारे २० हजार रुपयांची लाच स्विकारताना अभियंता बबन खोत व त्याचा पंटर किरण कोकाटे या दोघांना लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.यामध्ये सदर दोघांना पथकाने ताब्यात घेतले.
या कारवाईतील पथका मध्ये कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे पोलिस उपाधीक्षक आदिनाथ बुधवंत ,शरद पुरे ,विकास माने ,सुनील घोसाळकर ,मयुर देसाई ,रुपेश माने यांचा समावेश होता.या कारवाईने पालिका आवारात मोठी खळबळ उडाली. दरम्यान ,ही कारवाई होताच काही सामाजिक कार्यकर्त्यांनी पालिका आवारात फटाक्या लावल्याने हा मोठा चर्चेचा विषय ठरला आहे.या घटनेची नोंद शिवाजीनगर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.