प्रेस मीडिया वृत्तसेवा :
इचलकरंजी / प्रतिनिधी
शिरोळ तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेसाठी ९२ प्रकरणे ऑनलाईन दाखल करूनही त्याचा तपास लागत नाही, याबाबत तात्काळ योग्य चौकशी करून प्रकरणांचा तपास करावा, यासह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य कष्टकरी शेतमजूर संघटनेच्यावतीने येथील प्रांत कार्यालयासमोर आजपासून बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी विविध घोषणा देत बोंब मारो आंदोलन केले.त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
शिरोळ येथील संजय गांधी निराधार योजनेच्या कार्यालयातून शासनाच्या निर्देशानुसार कामकाज चालत नाही. येथे भोंगळ, मनमानी, अरेरावी, दादागिरी करून सर्वसामान्य नागरिकांना जाणीवपूर्वक त्रास देण्यात येत आहे. खऱ्या लाभार्थ्यांना शासकीय योजनेपासून अलिप्त ठेवले जात आहे. लाभार्थ्यांना न्याय मिळत नाही. त्यामुळे शासकीय येथील अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, तसेच दिवाळीपूर्वी पेन्शन मिळावी, आदी मागण्यांचे निवेदन महाराष्ट्र राज्य कष्टकरी शेतमजूर संघटनेतर्फे प्रांत कार्यालयात २७ ऑक्टोबर रोजी दिले होते. यावेळी आठ दिवसांत मागण्या मान्य न झाल्यास १० नोव्हेंबरपासून प्रांत कार्यालयासमोर लाभार्थ्यांसह ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. मात्र, आंदोलनाचा इशारा देवूनही याची पूर्तता होवू शकली नाही. त्यामुळे या अनुषंगाने शेतमजूर संघटनेतर्फे आज बुधवारपासून प्रांत कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले. यावेळी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत बोंब मारो आंदोलन करण्यात आले. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येणार असून गुरुवारी भीक मांगो आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.
या बेमुदत आंदोलनात कष्टक-यांचे नेते
सुरेश सासणे, सामाजिक कार्यकर्ते विश्वास बालिघाटे, अलाउद्दीन नदाफ, सदाशिव कुंभार, महावीर मगदूम, शोभा पाणदारे, अब्दुल कादर मुजावर, शामराव भानुसे, मल्लाप्पा कोरे, भिकू काळगे, सरोजिनी मोहिते, नवसाबाई कांबळे आदींसह महिला व जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.