आपला विजय निश्चित ..सतेज पाटील.
इचलकरंजी / प्रतिनिधी
मागील पाच वर्षात स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधीत्व करताना केलेली विकासकामे आणि अनुभव यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात जास्त मतदार असलेल्या इचलकरंजीतून आपणांस 85 टक्के मतदान मिळेल, असा दावा करत विधानपरिषद निवडणुकीत पुन्हा संधी दिल्यास इचलकरंजीचा पाणी आणि कचर्याचा प्रश्न निश्चितपणे मार्गी लावू, अशी ग्वाही जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार सतेज पाटील यांनी दिली. महाविकास आघाडीत कोणतीही धुसफूस नसून आघाडी एकसंध असल्याने आगामी विधानपरिषद निवडणुकीतआपला विजय निश्चित असल्याचेही आमदार पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.
दरम्यान, आमदार सतेज पाटील यांनी माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांची भेट घेऊन त्यांच्याशीही चर्चा केली. त्यावेळी आमदार प्रकाश आवाडे हे परगांवी गेले असून या संदर्भात त्यांच्याशीच चर्चा करावी, तेच याचा निर्णय घेतील असे श्री. आवाडे यांनी सांगितले. यावेळी स्वप्निल आवाडे, उत्तम आवाडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
आगामी होवू घातलेल्या विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज शनिवारी जिल्ह्याचे पालकमंत्री ,आमदार सतेज पाटील हे इचलकरंजीत आले होते. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीच्या सर्वच सदस्यांची भेट घेऊन चर्चा केली. शहरात आगमन होताच त्यांनी प्रथमत: शिवतीर्थ येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. त्यानंतर शहर काँग्रेसचे अध्यक्ष संजय कांबळे यांच्या निवासस्थानी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांची भेट घेतली. त्यानंतर संभाजी नाईक, माजी आमदार अशोकराव जांभळे, राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य मदन कारंडे, रविंद्र माने तसेच शिवसेना शहर कार्यालयात शिवसेना पदाधिकार्यांशी चर्चा केली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत आमदार पाटील यांनी आपली भूमिका मांडली.
ते म्हणाले, संपूर्ण जिल्ह्यात आपल्याला पाठबळ मिळत असून आजमितीला 253 पेक्षा अधिक संख्याबळ आपल्याकडे आहे. काँग्रेसचे काही नगरसेवक बैठकीवेळी उपस्थित नसल्याच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी, स्थानिक राजकारणामुळे काहींना अडचणी असतात. परंतु प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे सर्वजण आपल्या संपर्कात असल्याचे सांगितले. माजी आमदार महादेवराव महाडीक यांनी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांची भेट घेतल्यासंदर्भात छेडले असता आमदार पाटील यांनी मतदार म्हणून प्रत्येकजण कोणाचीही भेटू घेऊ शकतो. मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर हे महाविकास आघाडीचे असून त्यांची साथ व सहकार्य आम्हालाच मिळणार असल्याचे स्पष्ट केले. विरोधकांकडून महाविकास आघाडीत अंतर्गत वाद असल्याबद्दल अफवा पसरवल्या जात असल्या तरी आघाडी एकसंध आहे. कोणत्याही प्रकारची अडचण नसल्याचे सांगितले. विरोधकांकडून डावपेच आखले जात असले तरी त्याकडे दुर्लक्ष न करता आपण आपली व्युहरचना व्यवस्थितपणे आखली असून आजमितीला आपल्याकडे 253 पेक्षा अधिक मतदार असल्याने आपला विजय निश्चित असल्याचे आमदार पाटील म्हणाले.
या पत्रकार परिषदेत आमदार राजूबाबा आवळे, मदन कारंडे, माजी आमदार राजीव आवळे, सागर चाळके, रविंद्र माने, प्रकाश मोरबाळे, शशांक बावचकर, संजय कांबळे, राहुल खंजिरे, विठ्ठल चोपडे, महादेव गौड, नितीन जांभळे, अब्राहम आवळे आदी उपस्थित होते.