इचलकरंजीत वृक्षांची नासधूस केल्याचा प्रकार उघडकीस

 संबंधितांवर कारवाई करण्याची व्हिजन इचलकरंजी संस्थेची मागणी.





प्रेस मीडिया वृत्तसेवा :

इचलकरंजी / प्रतिनिधी

इचलकरंजी शहरातील खवरे मार्केटमध्ये लावण्यात आलेल्या वृक्षांची अज्ञातांकडून नासधूस केल्याचा प्रकार उघडकीस आला. 

ट्रीगार्डसह वृक्ष मुळासकट काढून टाकणाऱ्या वृत्तीचा व्हिजन इचलकरंजी या सामाजिक संस्थेतर्फे निषेध करत पुन्हा त्याच ठिकाणी वृक्षाचे रोपण करण्यात आले. या प्रकाराबाबत संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, वृक्षांची नासधूस करणाऱ्या समाज कंटकांवर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन व्हिजन इचलकरंजीच्यावतीने मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल यांना ई मेलद्वारे पाठवण्यात आले.

व्हिजन इचलकरंजी या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून लोकसहभागातून थोरात चौकातील कै. शिवाजीराव खवरे भाजी मार्केट येथे महावृक्षारोपण कार्य सुरू आहे. उजाड अशा थोरात चौकातील आठवडी बाजारात विक्रेत्यांना व नागरिकांना सावली मिळावी, वृक्षारोपणाचे महत्त्व समजावे, या हेतूने ही लागवड केली जात आहे. याअंतर्गत गेल्या चार महिन्यात १०९ देशी वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. तर पुढेही आणखी दोनशे झाडांची लागवड करण्याचे आयोजन आहे. यासाठी नागरिक व पालिकेची मोलाची मदत मिळत आहे. मात्र, येथे लावण्यात आलेल्या वृक्षांची काही समाजकंटकांकडून नासधूस करण्याचे काम सुरू आहे. शनिवारी सकाळी येथील एक सुमारे १५ फुटी वृक्ष मुळासकट उपटून टाकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. त्याचे ट्री गार्डदेखील काढून टाकण्यात आले होते. त्यामुळे व्हिजन इचलकरंजीने हाती घेतलेल्या या उपक्रमाच्या गतीला ब्रेक लावण्याचे कार्य काही समाज कंटकांकडून होत आहे. त्यामुळे या अज्ञात समाज कंटकांचा शोध घेवून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशा विकृती वेळीच ठेचावी, त्यांच्याकडून नुकसान भरपाई वसूल करावी, असे या निवेदनात  नमूद केले आहे.

वृक्षाचे पुनर्रोपण करताना कौशिक मराठे, गोपाळ खंडेलवाल, अशोक पाटणी, राजेश व्यास, महावीर भन्साळी, उत्तम सुतार, सचिन सावंत यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post