महसुल क्षेत्रात मोठी खळबळ
प्रेस मीडिया वृत्तसेवा :
इचलकरंजी / प्रतिनिधी
शेत जमिनीच्या सात बारापत्रकी असलेला बँक कर्जाचा बोजा कमी करून नवीन सातबारा देण्यासाठी लाच मागितल्या प्रकरणी आलास-बुबनाळ येथील तलाठी गजानन आप्पासो माळी याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज गुरुवारी जाळ्यात पकडले. पोलिस उपअधिक्षक आदिनाथ बुधवंत यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली. अवघ्या दोन दिवसात शहरात लागोपाठ झालेल्या दोन कारवायांमुळे महसूल क्षेत्रात मोठी खळबळ माजली आहे.शिरोळ तालुक्यातील आलास - बुबनाळ येथील एका तक्रारदाराने आपल्या पाच एकर शेत जमिनीच्या सातबारा पत्रकी जयसिंगपुर उदगांव बँकेचा कर्जाचा बोजा कमी करुन नवीन सातबारा मिळावा यासाठी महिन्याभरापूर्वी आलास तलाठी कार्यालयात अर्ज दिला होता.
यासंदर्भात काम न झाल्याने त्यांनी आपल्या मित्राला तलाठी गजानन माळी याच्याकडे पाठविले होते. त्यावेळी माळी यांनी काम करुन देण्यासाठी 10 हजार रुपये लाचेची मागणी केली होती. या संदर्भात तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. तक्रारीनुसार पथकाने 3 नोव्हेंबर रोजी दोन पंचासमक्ष इचलकरंजी येथील काँग्रेस भवनजवळ पडताळणी केली. त्यावेळी माळी याने सात हजार रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. गुरुवारी सकाळी माळी याला पथकाने ताब्यात घेतले. तलाठी माळी याच्यावर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करून अटक करण्यात आली.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधिक्षक आदिनाथ बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक सतिश मोरे, सहाय्यक फौजदार संजीव बंबरगेकर, पोलिस नाईक नवनाथ कदम, सुनिल घोसाळकर, कृष्णात पाटील यांच्या पथकाने केली. दोन दिवसांपूर्वी इचलकरंजी नगरपरिषदेच्या नगररचना विभागातील शाखा अभियंता बबन खोत व पंटरला लाच स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आले होते. त्यानंतर लगेचच दुसरी कारवाई झाल्याने महसुल क्षेत्रात मोठी खळबळ माजली आहे.