प्रेस मीडिया वृत्तसेवा :
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी
(९८५०८ ३०२९०)
गेल्या दोन वर्षात निर्माण झालेले कोरोनी वातावरण काही प्रमाणात आता बदलू लागले आहे.अर्थात कोरोनाचे संकट टळलेले नाहीच. पण कोरोनासह सर्वच प्रकारच्या सामाजिक,आर्थिक,राजकीय,सांस्कृतिक संकटांवर मात करायची असेल तर विचार समृद्धता ही महत्त्वाची बाब आहे. आणि विचार देण्याचे एक महत्त्वाचे मराठी सांस्कृतिक वैशिष्ट्य म्हणून दिवाळी अंकांकडे पहावे लागेल.या वर्षीही बाजारात अनेक दिवाळी अंक दिसत आहेत ही चांगली गोष्ट आहे. मराठी वाचक ,साहित्य, रसिक यांचे अतूट नाते आहे.
" मनोरंजन " मासिकाचे संपादक असलेले का.र. मित्र यांनी १९०९ साली तब्बल अडीचशे पृष्ठांचा मनोरंजन मासिकाचा अंक प्रकाशित केला होता.का.र.मित्र यांचे मूळ आडनाव आजगावकर.ते सावंतवाडीचे. साहित्यक्षेत्रात त्यांनी मित्र हे नाव घेतले आणि तेच रूढ झाले. त्यांचा "मनोरंजन "मासिकाचा तो अंक दिवाळी अंकाची प्रारंभ मानला जातो. हा दिवाळी अंक कर्नाटक प्रेस, मुंबई वैभव प्रेस ,इंदुप्रकाश आणि निर्णय सागर प्रेस अशा चार ठिकाणी छापला गेला होता. त्यामध्ये साहित्यसम्राट न. चि. केळकर ,रँग्लर परांजपे, नामदार गोखले ,बालकवी आदी अनेक मान्यवरांच्या साहित्याचा समावेश होता. ११२ वर्षापूर्वी दिवाळी अंकांची मुहूर्तमेढ रोवून मराठी सहित्य, संस्कृती समृद्ध करण्यात योगदान देणाऱ्या का. र.मित्र यांचं हे दीडशेवे जन्मवर्षं आहे. १ नोव्हेंम्बर १८७१ रोजी मित्र यांचा जन्म झाला. मराठी दिवाळी अंकाची मुहुर्तमेढ रोवणाऱ्या मित्रांचे दीडशेवे जन्मवर्ष हे या दिवाळीचे वेगळे वैशिष्ट्य आहे. आज मराठीत चारशे ते पाचशे दिवाळी अंक प्रकाशित होत असतात.यावरूनच मराठी वाचक, मराठी लेखक,मराठी रसिक, मराठी साहित्य,मराठी प्रकाशक,मराठी संपादक अर्थात एकूण मराठी माणूस आणि दिवाळी अंक यांचे नाते अतिशय समृद्ध आहे.
मराठी वाङ्मयीन व्यवहारात दिवाळी अंकांना एक आगळेवेगळे महत्त्व आहे. या अंकांमधून शेकडो साहित्यिक लिहिते होतात. अनेक नवोदितांना संधी मिळत असते. मराठी साहित्य रसिक तृप्त होत असतो. कथा ,कविता ,कादंबरी, ललित, वैचारिक ,नाट्य अशा विविध स्वरूपाचे लेखन ऐन दिवाळीत या अंकाच्या माध्यमातून मिळत असते. त्यामुळे दिवाळीची सुट्टी विशेष आनंद देऊन जाते.एका अर्थाने दिवाळी अंक हे मनोरंजन आणि मन पोषण करत असतात. दिवाळी अंकातून प्रसिद्ध होणारे साहित्य पुस्तकांएवढेच महत्त्वाचे असते. साहित्य आणि समाज यांचे नाते दृढ होणे हे समाज स्वास्थ्यासाठी आवश्यक असते.समाज परिवर्तनाची चळवळ गतिशील करण्यात ,मानवी मनाचे कंगोरे जाणून घेण्यात साहित्य महत्त्वाची भूमिका बजावत असते. समाज जीवनात जी स्पंदने निर्माण होतात ,जी वाटचाल होत असते, ढवळाढवळ होत असते त्यातून प्रेरणा घेऊन साहित्याची निर्मिती होत असते. गेल्या शंभर वर्षाचा इतिहास पाहिला तर मराठीतील बहुतांश ज्येष्ठ लेखक दिवाळी अंकासाठी आवर्जून लेखन करतात हे लक्षात घेतले पाहिजे.
साहित्यामध्ये हे समाजाला बरोबर घेत समाजाला पुढे नेण्याची मोठी शक्ती असते.सामाजिक बांधिलकी आणि सामाजिक सामीलकीचे दर्शन त्यातून होत असते. कुसुमाग्रज म्हणायचे,' साहित्य ही मानवी संसारातील एक समर्थ किंबहुना सर्वात अधिक समर्थ अशी शक्ती आहे. समाज संस्कृतीच्या वातावरणात जिवंत राहतो. या संस्कृतीच्या प्रवासात सातत्य ठेवण्याचे, त्यांना प्रगत करण्याचे कार्य साहित्य करत असते. माणसे मर्त्य असतात पण त्यांनी उच्चारलेला वांग्मयीन शब्द मात्र अजरामर असतो.'
साहित्य हे माणसावर कोणते ना कोणते संस्कार केल्याशिवाय राहत नाही. साहित्य हे नेहमीच जीवनातील विविधतेचा, व्यामिश्रतेचाआणि गतिशीलतेचा शोध घेत असते. मराठीतील शेकडो दिवाळी अंकांमधून जीवनाच्या सर्व अंगांचाशोध घेणारे असे साहित्य पुढे येत असतो. सर्वाना बरोबर घेऊन जाणारी आपली चांगली परंपरा आपणच जपायची असते.वाचन लेखन संस्कृती रुजवणे ही महत्त्वाची गरज आहे. माणसाची बौद्धिक भूक लेखनामुळे आणि वाचनामुळे भागत असते. "वाचा " ही मानवी प्राण्यात विकसित झालेली शक्ती आहे. वाचन, लेखन आणि श्रवण या तीन कलांनी मानवी जीवन गतिमान व समृद्ध केलेले आहे. समर्थ रामदासांनी ' दिसामाजी काही लिहीत जावे ,प्रसंगी अखंडित वाचीत जावे ' म्हटले आहे तर महात्मा फुले यांनी 'थोडे दिन तरी मद्य वर्ज्य करा ,तोच पैसा भरा ग्रंथासाठी असा अखंड लिहून वाचनसंस्कृतीचा जागर केलेला. मराठी संत साहित्याने, मराठी विचार परंपरेने, मराठी दर्शनाने वाचन ,लेखन,श्रावण संस्कृतीचा केलेला जागर फार महत्त्वाचा आहे.तो अधिक व्यापक करून पुढे नेणे ही आपली प्रत्येकाची सामाजिक,सांस्कृतिक जबाबदारी आहे.
लेखक काय सांगतो हे जाणून घेणे फार महत्त्वाचे असते. बेकन म्हणाला होता, ' वाचनाने माणसाला परिपूर्णता येते, संभाषणाने तत्परता येते आणि लिहिण्याने मोजकेपणा येतो. मनातील आशयाशी सुसंगत असा आकृतीबंध तयार करून लेखक लिहित असतो. लेखक हा अनेकदा आत्म जीवनाचा, आपल्या काळाचा आणि युगाचाही भाष्यकार असतो. लेखनाचा मुख्य उद्देश मुळात संवाद साधण्याचा असतो. उत्तम ऐकले तर उत्तम बोलता येते ,उत्तम वाचले तर उत्तम लिहिता येते.म्हणून तर आपल्याला दोन कान आणि तोंड एकच आहे. बोलण्यापेक्षा दुप्पट ऐकले पाहिजे हे निसर्गालाही सांगायचे आहे. म्हणूनच आपण आपल्यातील वाचक जाणीवपूर्वक घडवायला हवा.दिवाळी अंक ही त्यासाठी सुवर्णसंधी आहे यात शंका नाही.
प्रत्येक कुटुंबाने एक दैनिक, एक नियतकालिक ,एक दिवाळी अंक ,एक पुस्तक विकत घेऊन वाचनाची कौटुंबिक सवय लावून घेतली पाहिजे. महाराष्ट्र सांस्कृतिक दृष्ट्या पुढे जायला ते फार महत्त्वाचे ठरणार आहे.गेली दोनवर्षं जगभर कोरोनाच्या अभितपूर्व संकटामुळे मानवी जीवन भयभीत व विस्कळीत झाले आहे. फार मोठी जीवित व वित्त हानी झाली आहे. या संकटामुळे आणि राज्यकर्त्यांच्या चुकीच्या धोरणांमुळे लाखो व्यक्तींना मानसिक,आर्थिक,सांस्कृतिक अशा विविध आव्हानांशी मुकाबला करावा लागतो आहे.जीवनातील हा संघर्ष योग्य तऱ्हेने पेलायचा असेल तर त्यासाठी वाचन हे सर्वोत्तम उपयुक्त साधन आहे .लॉकडाऊनमुळे वाचन संस्कृती टिकवून ठेवण्यात व ती विकसित करण्यात मोठा अडथळा निर्माण झाला होता.अशावेळी प्रत्येक सुशिक्षित नागरीक बंधू भगिनींनी सार्वजनिक वाचनालयाचे वाचक - सभासद होऊन होऊन वाचन संस्कृती विकसित केली पाहिजे. त्याद्वारे आपले कुटुंब, समाज व राष्ट्र बलशाली करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
दिवाळी हा प्रकाशाचा सण आहे. अंधारातून प्रकाशाकडे नेणारा हा सण आहे.आपल्या मनातील उजेडाची ज्योत प्रज्वलित करण्याचा हा सण आहे. उजेडाचा उगम मनामध्ये निर्माण करण्यासाठी दिवाळी अंकांबरोबरच ग्रंथाचे,नियतकालिकांचे वाचन करणे गरजेचे आहे.सार्वजनिक वाचनालये हे सर्व वाचन साहित्य उपलब्ध करून देत असतात. त्याचा लाभ घेणे हे आपले नैतिक कर्तव्य आहे.ही दिवाळी त्या संकल्पाची ठरावी हा दिवाळी अंकाचे जनक असलेल्या का.र. मित्र यांच्या दिडशेव्या जन्मवर्षाचा आणि प्रकाश पूजक दिवाळीचा संदेश आहे.