पंडित नेहरू: आत्मनिर्भरतेचे प्रणेते

 रविवार ता.१४ नोव्हेंम्बर रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिन आहे.अलीकडे आत्मनिर्भर शब्द फार चर्चेत आहे.त्याचे प्रणेते आणि कृतीशील धोरणकर्ते नेहरुच होते.त्यांची आत्मनिर्भरता उभारणीवर आधारित होती.विकून खाणारी वाटोळी परनिर्भरता नव्हती.कारखाने,उद्योग हीच खरी राष्ट्रीय मंदिरे ‘ ही त्यांची भूमिका ही आत्मनिर्भरतेची सर्वोत्तम व्याख्या होती व आहे. ते आत्मनिर्भरतेचे प्रणेते होते. भारताच्या इतिहासाचा शोध घेऊन भविष्याची दिशा देण्याचे काम नेहरूंनी स्वातंत्र्यानंतरच्या दोन दशकात अतिशय प्रभावी पणे केले....



प्रेस मीडिया वृत्तसेवा :

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी

 (९८ ५०८ ३० २९०)

थोर स्वातंत्र्य सेनानी आणि स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पं.जवाहरलाल नेहरू भारतात संसदीय लोकशाही समाजवादाचा पाया घालणारे थोर नेते होते. १४ नोव्हेंबर १८८९ रोजी एका संपन्न कुटुंबात अलाहाबाद येथे त्यांचा जन्म झाला. २७ मे १९६४ रोजी ते कालवश झाले. देशाचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर आजही  ‘नेहरू मॉडेल ‘ विचारात घ्यावेच लागेल.आज ज्या आत्मनिर्भरतेची चर्चा सुरू आहे त्याचा पाया नेहरूंनी घातला आहे.’ कारखाने,उद्योग हीच खरी राष्ट्रीय मंदिरे ‘ ही त्यांची भूमिका ही आत्मनिर्भरतेची सर्वोत्तम व्याख्या होती व आहे. ते आत्मनिर्भरतेचे प्रणेते होते. भारताच्या इतिहासाचा शोध घेऊन भविष्याची दिशा देण्याचे काम नेहरूंनी स्वातंत्र्यानंतरच्या दोन दशकात अतिशय प्रभावी पणे केले.

प.नेहरु यांचे वडील पं.मोतीलाल नेहरू नामवंत वकील आणि काँग्रेसचे पुढारी होते.जवाहरलालजींचे प्राथमिक शिक्षण इंग्रज शिक्षिकेच्या देखरेखीखाली घरीच झाले.१९०५ साली ते इंग्लंडला शिकायला गेले. सात वर्षात विज्ञान शाखेच्या पदवीसह ते बॅरिस्टरही झाले. १९१२ साली ते भारतात परतले.१९१६ साली कमला कौल यांच्याशी त्यांचा विवाह झाला.माजी पंतप्रधान कालवश इंदिराजी गांधी या दाम्पत्याचे एकमेव अपत्य होत्या.

नेहरू भारतात परतल्यावर लगेच स्वातंत्र्य आंदोलनात सहभागी झाले.प्रारंभी लोकमान्य टिळक व अँनी बेझंट यांच्या ‘होमरुल चळवळीत ते कार्यरत होते.महात्मा गांधी यांच्या संपर्कात आल्यावर त्यांच्या राजकीय कार्याला व्यापक दिशा मिळाली.ते गांधीजींचे अनुयायी बनले.स्वातंत्र्य आंदोलनात नेहरूंना जवळजवळ नऊ वर्षे तुरुंगवास भोगावा लागला.याच काळात त्यांनी आत्मचरित्र,ग्लिम्पसेस ऑफ वर्ल्ड हिस्टरी,डिस्कव्हरी ऑफ इंडिया यासारखे अजरामर ग्रंथ लिहिले. या ग्रंथांतून एक महान इतिहासकार,तत्वज्ञ,विचारवंत,लेखक म्हणूनही त्यांची ओळख होते.

नेहरू काँग्रेसचे नेते बनले,अध्यक्ष बनले, १९२६ साली ते युरोपला गेले.तेंव्हा त्यांनी रशियाला भेट दिली.रशियाच्या प्रगतीने व व्यवस्थेने ते प्रभावित झाले.क्रांतिकारी मार्क्सवाद त्यांना रुचला नसला तरी जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी ,दारिद्र्य कमी करण्यासाठी भारतीय अर्थव्यवस्था बदलली पाहिजे अशी त्यांची धारणा बनली.१९२७ साली ‘ब्रुसेल्स ‘येथे परतंत्र राष्ट्रांच्या सभेत त्यांनी भारताचे प्रतिनिधी म्हणून सहभाग घेतला.त्यावेळी त्यांना संकुचित राष्ट्रवादाला आंतरराष्ट्रीय विचारांची जोड दिली पाहिजे याची तीव्र जाणीव झाली.त्यापद्धतीने ते विचार करू लागले.लोकशाही देश व हुकूमशाही देश यांच्या युद्धात भारत लोकशाही देशांच्या बाजूने ठाम उभा राहील अशी ग्वाही त्यांनी दिली.

१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला.अर्थातच पं.नेहरू भारताचे पाहिले पंतप्रधान बनले. नंतर अखेरपर्यंत सलग सतरा वर्षे ते पंतप्रधान होते.त्यांच्या कालखंडात मिश्र अर्थव्यवस्थेचे धोरण,निर्वासितांचे पुनर्वसन ,काश्मीरचा समिलीकरण आदी अनेक बाबी त्यांनी समर्थपणे हाताळल्या. भारतीय राज्यघटनेने जी संसदीय लोकशाही स्वीकारली तिची प्रतिष्ठापना व संवर्धन करण्यात नेहरूंचा फार मोठा पुढाकार होता. १९५२ पासून सुरू केलेल्या ‘पंचवार्षिक योजना ‘जलद आर्थिक विकासाची गुरुकिल्ली ठरल्या.समाजवादी समाजरचनेची ध्येये ठरवून त्या पद्धतीची धोरणे आखण्यात त्यांनी मोठी कामगिरी केली.तसेचअलिप्ततावादी राष्ट्रांचा गट करून जागतिक शांततेचा पुरस्कार करण्यात पुढाकार घेतला.

नेहरूंच्या राजकीय व सामाजिक विचारांवर अनेक मान्यवरांचा प्रभाव होता.जॉन स्टुअर्ट मिल,ग्लॅड्स्टॅन,जॉन मोर्ले,बरटोंल्ड रसेल,कार्ल मार्क्स,बर्नाड शॉ,महात्मा गांधी आदी अनेकांचा प्रभाव त्यांच्यावर होता.जात -धर्माच्या नावाखाली चालणाऱ्या अंधश्रद्धा व कर्मठपणा त्यांना मान्य नव्हता.सार्वजनिक उद्योगधंदे हीच देशाची मंदिरे आहेत आणि विकास हाच देशाचा धर्म आहे ही त्यांची धारणा होती.राज्यसंस्था आणि धर्म यांची एकमेकांत सरमिसळ त्यांना मान्य नव्हती.

नेहरूंचे राजकीय विचार उदारमतवादी होते.समाजातील प्रत्येक व्यक्तीला विकासाची संधी मिळाली पाहिजे,तो तिचा हक्क आहे असे ते मानत असत.समता,मूलभूत उत्पादन,साधनांची मालकी व नियंत्रण शासनाच्या हाती असणे,राष्ट्राच्या संपत्तीची न्याय्य वाटणी आणि समाजातील प्रत्येक व्यक्तीला आपला विकास करण्याची संधी उपलब्ध असणे या सर्व कल्पना नेहरूंच्या समाजवादी समाजरचनेचा भाग होत्या.अर्थात काही बदल त्यांनी केले.जुन्या कारखान्यांचे राष्ट्रीयीकरण करण्यात देशाची संपत्ती वाया घालवण्यापेक्षा सरकारने स्वतःचे नवे उद्योगधंदे उभे करावेत याला त्यांनी प्राधान्य दिले. मिश्र अर्थव्यवस्थेची कास धरली.आर्थिक नियोजन स्वीकारले.नेहरूंचा समाजवाद सामाजिक न्यायाच्या प्रस्थापनेचे ध्येय पुढे ठेऊन चालणारा असल्याने त्यांचा लोकशाही विचारांचा पाया पक्का होता.लोकशाही आणि समाजवाद यांचा सुंदर मिलाफ त्यांच्या विचारात दिसून येतो.

नेहरूंचा राष्ट्रवाद हा ऐक्याचा राष्ट्रवाद होता. भारतीय राष्ट्रवादामागे कोणतीही धार्मिक भावना असता कामा नये असे त्यांचे मत होते.आपल्या देशाच्या पूर्व परंपरा व पराक्रम यांची सामुदायिक स्मृती म्हणजेच राष्ट्रवाद असे ते मानत होते.जगाचा इतिहास,वर्तमान आणि संस्कृतीचा सूक्ष्म अभ्यास त्यांनी केला होता. म्हणूनच ‘भारताचा शोध ‘ मध्ये ते म्हणतात ‘आपल्या भोवती काय चालले आहे याचा विचार न करता आपल्यापैकी अनेक लोक प्राचीन काळातच वावरत असतात.काहींना वैदिक काळाची पुन्हा प्रस्थापना करायची आहे,तर काहींना इस्लामच्या आरंभीचा काळ पुन्हा यायला हवा आहे.आपली प्राचीन संस्कृती निराळ्या परिस्थितीत निर्माण झाली होती हे आपण विसरतो.आपल्याकडील अनेक परंपरा ,सवयी,रुढी, सामाजिक कायदे, वर्णव्यवस्था ,स्त्रियांना दिलेले निम्न स्थान ,धार्मिक कर्मठपणा या सर्व गोष्टी आजच्या परिस्थितीत अगदी कालबाह्य ठरलेले भूतकाळाचे अवशेष आहेत.’आपल्याला प्रगती करायची असेल तर साम्राज्यवाद गाडला पाहिजे,साम्राज्यवादाला विरोध करणे हा समाजवादाच्या पूर्वतयारीचा मुख्य टप्पा आहे ही त्यांची धारणा होती.

नेहरूंनी स्वीकारलेले अलिप्ततावादाचे धोरण म्हणजे जागतिक राजकारणाकडे पाठ फिरवून तटस्थता स्वीकारणे नव्हते.तर विकसनशील देशांची प्रगती झाली पाहिजे हा त्यामागे विचार होता.त्यांनी पुरस्कारलेली पंचशील तत्वे म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंधातील नव्या विचारांचे योगदान होते.नेहरूंच्या धोरणावर अनेकजण टीका करतात.तर त्यांच्या योजनांची फक्त नावे बदलण्यात धन्यता मानतात.ब्रिटिशांनी सर्वार्थाने खिळखिळा करून ठेवलेला देश नेहरूंनी अल्पावधीत समर्थपणे बांधला,उभा केला हे नाकारणे म्हणजे राष्ट्रीय कृतघ्नपणा आहे.वैचारिक मतभेद वेगळे आणि कार्यकर्तुत्वच नाकारणे वेगळे आहे याचे भान नेहरू प्रारूपावर टीका करताना ठेवले पाहिजे.

शेवटी संसदीय लोकशाही,धर्मनिरपेक्ष राष्ट्रवाद, सामाजिक न्यायावर आधारित समाजवाद आणि अलिप्ततावाद ही पं.नेहरू यांच्या विचारातून निर्माण झालेल्या मॉडेलची ठळक वैशिष्ट्ये आहेत.संसदीय लोकशाही कोणा साम्राज्यवादी राष्ट्राच्या दावणीला बांधली जाते की काय अशी शंका येऊ लागली .धर्मनिरपेक्ष राष्ट्रवादाऐवजी सांस्कृतिक राष्ट्रवाद मांडला जाऊ लागला आहे.त्याला पोषक व पूरक वातावरण पद्धतशीरपणे भांडवली शक्ती तयार करत आहेत.समाजवाद आणि अलिप्ततावाद यांचे आवाज दाबून टाकण्याचा ,त्यांना क्षीण करण्याचा प्रयत्न होतो आहे.अशा वेळी नेहरूंच्या लोकशाही समाजवादातील काळाला उपयुक्त ठरणारे विचार पुढे आणण्याची गरज आहे. आज नेहरूंना नावे ठेवत त्यांनी उभारलेल्या संस्था विकण्याचा सपाटा लावला जात आहे.ही आत्मनिर्भरता नव्हे आत्मवंचना आहे.  कोणतेही नेतृत्व  उभारणी कशाची व कशी करते , देशाच्या सर्वांगीण विकासात भर कशी घालते यावरून त्याचे मूल्यमापन होत असते.नेहरू त्याबाबत आजही जागतिक स्तरावरील सर्वश्रेष्ठ नेते ठरतात.पंडित नेहरू यांच्या १३२ व्या जन्मदियानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन.

————————————–

लेखक समाजवादी प्रबोधिनीच्या वतीने गेली बत्तीस वर्षे  नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाचे संपादक आहेत.)

Post a Comment

Previous Post Next Post