प्रेस मीडिया वृत्तसेवा :
इचलकरंजी / सागर बाणदार
पोटाची खळगी भरण्यासाठी संसार पाठिवर घेवून आपल्या मुला - बाळांसह ऊस तोड मजूर मराठवाडा व कर्नाटकातून कोल्हापूर जिल्ह्यात स्थलांतरित होत आहेत. त्यांच्या मुलांचे शिक्षण खंडित होवू नये ,या साठीअब्दुललाट येथे विद्यो्दय मुक्तांगण परिवार संचलित सेवांकुर हंगामी साखर शाळा अभ्यास केंद्राचे उदघाटन सामाजिक कार्यकर्ते ,उपमहाराष्ट्र केसरी पै.अम्रुतमामा भोसले यांच्या हस्ते१ करण्यात आले. तसेच विविध मान्यवरांच्या हस्ते साखर शाळेतील मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.या उपक्रमामुळे ऊसतोड मजुरांच्या मुलांच्या हातात कोयताऐवजी पाटी - पुस्तके आल्याने हा एक मोठा कौतुकाचा विषय ठरला आहे.
विद्यो्दय मुक्तांगण परिवारच्या वतीने समाजातील वंचित ,उपेक्षित घटकातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहे.याशिवाय या परिवारचे विनायक माळी ,त्यांच्या पत्नी सार्शा माळी व त्यांचे सहकारी हे अगदी निरपेक्ष भावनेने गेल्या पाच वर्षांपासून अब्दुललाट ,शिरदवाड यासह अन्य ठिकाणी विद्योदय मुक्तांगण परिवार अंतर्गत सेवांकुर हंगामी साखर शाळा हा ऊस तोड मजुरांच्या मुलांसाठी दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा उपक्रम चांगल्या पध्दतीने राबवत आहेत. त्यामुळे या मुलांचे कायम स्थलांतरामुळे शिक्षणाशी असलेली नाळ तुटण्याचा धोका टळून उलट आनंददायी शिक्षणाची गोडी चाखण्याची चांगली संधी उपलब्ध होत आहे.यंदाच्या ऊस गळीत हंगामात ऊसतोड करुन पोटाची खळगी भरण्यासाठी मराठवाडा ,कर्नाटकातून मोठ्या प्रमाणात ऊसतोड मजुरांच्या टोळ्या जिल्ह्यातील विविध ठिकाणी दाखल झाल्या आहेत.
अब्दुललाट व शिरदवाड परिसरात देखील या टोळ्यांनी खोप बांधून तात्पुरता निवारा शोधला आहे. त्यांच्यासोबत त्यांची बायका - मुलं देखील आली आहेत. त्यामुळे या मुलांचे गावाकडील शिक्षण अर्धवट राहू नये ,यासाठी यंदाही विदयोदय मुक्तांगण परिवारने सेवांकुर हंगामी साखर शाळा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेवून त्याची चांगली तयारी केली आहे. त्याच अनुषंगाने नुकताच अब्दुललाट येथे सेवांकुर हंगामी साखर शाळा अभ्यास केंद्राचे उदघाटन सामाजिक कार्यकर्ते ,उपमहाराष्ट्र केसरी पै.अम्रुतमामा भोसले यांच्या हस्ते करण्यात आले.तसेच मान्यवरांच्या हस्ते साखर शाळेतील मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतात ऊसतोड मजुरांच्या मुलांच्या हातामध्ये कोयता देण्याऐवजी पाटी - पुस्तके देण्याचे कार्य हे समाजाला आणि देशाला प्रगतीपथावर नेणारे आहे. त्यामुळे या सामाजिक कार्याला आमचे नेहमीच चांगले सहकार्य राहणार आहे ,अशी ग्वाही देत या पवित्र शिक्षण कार्याला सामाजिक संस्था ,संघटना व दानशूर व्यक्तींनी मदतीचा हात देवून हे कार्य पुढे न्यावे ,असे आवाहन केले.
यावेळी संजय मेटे, सुदीप वडींगे , दीपक पाटील ,अवधूत पाटील , अमीन पठाण, प्रियांका आदके , स्वाती पुजारी , दीपा स्वामी यांच्यासह अन्य उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्तविक संस्थेचे अध्यक्ष विनायक माळी यांनी तर आभार प्रदर्शन रमाताई फाटक यांनी केले.