डीकेटीईतून देशाच्या संरक्षण क्षेत्रात करिअर करण्याची संधी
प्रेस मीडीया वृत्तसेवा :
इचलकरंजी : प्रतिनिधी
देशाच्या संरक्षण क्षेत्रांतर्गत तंत्रशिक्षणामध्ये पारंगत तंत्रज्ञ तयार करणे हा उद्देश डोळयासमोर ठेवून भारत सरकारचे संरक्षण मंत्रालय, संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डी.आर.डी.ओ.) व अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद, (ए.आय.सी.टी.ई.) नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने एम्.टेक. इन डिफेन्स टेक्नॉलॉजी हा पदव्युत्तर अभ्यासक्रम तयार केला आहे. हा अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी भारतातील आय.आय.टी., एन.आय.टी. तसेच काही निवडक, २५ अग्रगण्य इंजिनिअरींग कॉलेजला परवानगी देण्यात आलेली आहे. देशातील अग्रगण्य कॉलेजच्या यादीमध्ये डीकेटीई चा अंतर्भाव करण्यात आलेला आहे. या अभ्यासक्रमाचा डीकेटीईच्या टेक्स्टाईल अॅन्ड इंजिनिअरींग इन्स्टिटयूट मध्ये शैक्षणिक वर्ष २०२१-२२ पासून शुभारंभ होत आहे.
डीकेटीईमध्ये कराराप्रसंगी आयडीएसटीचे प्रेसिडंट डॉ सी.एल. धामेजनी, चेअरमन बी.बी. सर्वदे, सेक्रेटरी जनरल एस.एस.कुलकर्णी यांच्यासह डीकेटीईचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, आमदार प्रकाश आण्णा आवाडे, डॉ ए.बी. सौंदत्तीकर, सचिव डॉ सपना आवाडे, ट्रस्टी एस.डी. पाटील, सुनिल पाटील, स्वप्नील आवाडे, डायरेक्टर प्रा. डॉ. पी.व्ही. कडोले, उपसंचालक, डॉ यु.जे.पाटील, डॉ सौ. एल.एस.आडमुठे, डीन डॉ आर.एन.पाटील व सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक तर ऑनलाईनद्वारे डॉ हरीभाउ श्रीवास्तव डी.जी. टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट, डॉ आर.रघोत्तमा राव, व्हाईस प्रेसींडंट आयडीएसटी, डॉ. ए.एम.एन योगी, चेअरमन आयडीएसटी, बेंगलोर, डॉ चंद्रप्रकाश चेअरमन फायनान्स आयडीएसटी, दिल्ली यांचे मागदर्शन झाल्यावर सदर कराराचे आदान प्रदान करण्यात आले.
यावेळी बोलताना श्रीवास्तव म्हणाले की डीकेटीई ही तंत्रज्ञान पुरवणारी देशातील नामांकित संस्थेसोबत करार झाल्यामुळे डीकेटीईचे अभियंते आपले तांत्रिक कौशल्याची सेवा वेळोवेळी देत राहतील याचा आनंद होत आहे. संस्थेच्या वतीने डायरेक्टर डॉ पी.व्ही. कडोले यांनी स्वागत व प्रास्ताविक करुन संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला तर आमदार प्रकाश आवाडे म्हणाले, देशाच्या संरक्षण क्षेत्रात डीकेटीई सेवा देण्यास सज्ज झाली असून यासाठी डीकेटीईची निवड केल्याबद्दल आम्हाला अभिमान आहे असे नमूद केले.
एम.टेक. डिफेन्स टेक्नॉलॉजी हा अभ्यासक्रम इंजिनिअरींग कॉलेजमध्ये प्रभावीपणे राबविण्याची जबाबदारी डीआरडीओने इंडियन डिफेन्स सायंटीस्ट अॅन्ड टेक्नॉलॉजीस्ट (आयडीएसटी) या भारत सरकारच्या अंगिकृत संस्थेवर सोपवली आहे. त्यामुळे त्या अनुषंगाने आयडीएसटी व डीकेटीईचे टेक्स्टाईल अॅन्ड इंजिनिअरींग इन्स्टिटयूट यांच्यामध्ये सामंजस्य करार झाला आहे. या करारांतर्गत विद्यार्थी एम.टेक. डिफेन्स टेक्नॉलॉजी हे शिक्षण घेत असताना डीआरडीओ च्या लॅबोरेटरीज मध्ये प्रॅक्टीकल्स, संशोधनात्मक प्रकल्प पूर्ण करतील. डीआरडीओ येथील शास्त्रज्ञाबरोबर चर्चा करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळेल तसेच डीआरडीओ च्या संशोधकामार्फत हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना शिकवण्यात येणार आहे. या अभ्यासक्रमामुळे भारताची संरक्षण सिध्दता वाढण्याकरीता व संरक्षण साहित्य उत्पादनामध्ये आत्मनिर्भर होण्याकरीता लागणारे कुशल मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्याचा भारत सरकारचा उददेश पूर्ण होईल.
एम.टेक. डिफेन्स टेक्नॉलॉजी हा अभ्यासक्रम सुरु करण्याकरीता परवानगी देण्यासाठी एआयसीटीई ने खूप कडक निकष लावले होते डीकेटीईने हे सर्व निकष पूर्ण केल्यामुळे त्यांना हा अभ्यासक्रम सुरु करण्यास परवानगी मिळालेली आहे. पश्चिम महाराष्ट्रामधून हा अभ्यासक्रम सुरु करणारे डीकेटीई हे एकमेव इंजिनिअरींग कॉलेज आहे.
हा अभ्यासक्रम संरक्षण क्षेत्रात करिअर करु इच्छिणा-यांसाठी मोठी संधी असेल असे मत संरक्षण विभागाने व्यक्त केले आहे. केंद्रसरकार कडून भारताला आत्मनिर्भर बनविण्यासाठी संरक्षण क्षेत्रातील सुधारणांसाठी भरीव तरतूद केली जात आहे. त्यामुळे संरक्षण क्षेत्रामध्ये आत्मनिर्भर भारत बनविण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना गती मिळाली आहे.
भारताच्या रक्षा बजेटमध्ये मोठे बजेट हे शस्त्रास्त्रे आयात करण्यावर होते. सद्यस्थितीमध्ये भारताची संरक्षण सज्जता ही ब-याच प्रमाणावर विदेशातून आयात होणा-या शस्त्रास्त्रे व उपकरणांवर अवलंबून आहे. शस्त्रांस्त्रासाठी असणारी भारतीयांचे परावलंबन कमी करणे,डिफेन्स इंडस्ट्रीजना चालना देणे हे विविध उद्देश सरकार समोर आहेत व त्याकरीता कुशल मनुष्यबळाची निर्मिती करण्याकरीता डी.आर.डी.ओ. व ए.आय.सी.टी.ई. यांच्या संयुक्त विद्यमाने एम्.टेक. इन डिफेन्स टेक्नॉलॉजी हा पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरु करण्यात आला आहे.
दोन वर्षाच्या अभ्यासक्रमात संरक्षण क्षेत्रातील तंत्रज्ञानावर आधारीत सैध्दांतिक आणि विविध कौशल्ये शिकविली जाणार आहेत. चार सत्राच्या या अभ्यासक्रमाला ८० क्षेयांक असणार आहेत. कॉम्बॅट टेक्नॉलॉजी, एरो टेक्नॉलॉजी, नाव्हल टेक्नॉलॉजी, कम्युनिकेशन सिस्टीम अॅन्ड सेन्सर्स, डायरेक्टेड एनर्जी टेेक्नॉलॉजी आणि हाय एनर्जी मटेरियल टेक्नॉलॉजी अशा ६ विशेष विषयामध्ये हा अभ्यासक्रम उपलब्ध असेल. या अभ्यासक्रमासाठी इंडियन डिफेन्स सायंटीस्ट अॅन्ड टेक्नॉलॉजीस्ट चे सहकार्य मिळेल असेही संरक्षण मंत्रालयातर्फे सांगण्यात आले. ऑनलाईन व ऑफलाईन अशा दोन्ही माध्यमातून अभ्यासक्रम शिकविण्यात येईल. हे शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांना डी.आर.डी.ओ. च्या लॅबोरेटीरीज, पब्लिक सेक्टर युनिटस व खाजगी उदयोगधंदयामध्ये एम.टेक. प्रकल्पावर काम करण्याची संधीही मिळेल. त्यामुळे संरक्षण क्षेत्रामध्ये मध्ये संशोधन व करिअर करु इच्छिणा-या विद्यार्थ्यांसाठी हा प्रोग्राम म्हणजे एक सुवर्ण संधीच असेल.
बी.ई./बी.टेक. इलेक्ट्रीकल, केमिकल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स अॅन्ड टेलिकम्युनिकेशन, इन्स्ट्रूमेंटेशन, एरोनॉटीक्स यांच्या संबंधित विषयांमध्ये पदवी प्राप्त केलेले विद्यार्थी एम.टेक. इन डिफेन्स टेक्नॉलॉजी या पदव्युत्तर अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेण्यासाठी पात्र असतील. हा अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण करणा-या विद्यार्थ्यांना डी.आर.डी.ओ. सारख्या संस्था, आय.एस.आर.ओ., भारत इंडिया, टाटा डिफेन्स, एल अॅन्ड टी, भारत फोर्ज, महिंद्रा अॅन्ड महिंद्रा म्हणजेच संरक्षण सामुग्री निर्मितीच्या क्षेत्रात कार्यरत असणा-या चौदाशेहून जास्त अशा अग्रगण्य कंपन्यामध्ये नोकरीची उत्तम संधी उपलब्ध होणार आहे. साहजिकच आत्मनिर्भर भारतचे केंद्र सरकारचे उद्दीष्ट प्रत्यक्षात साकार होण्यास हातभार लागेल.