केंद्र शाळेतील टॅब खरेदीत मोठा घोटाळा ; नगरसेवक शशांक बावचकर यांचा आरोप

घोटाळ्याची चौकशी होवून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी  .




प्रेस मीडिया वृत्तसेवा :

इचलकरंजी / प्रतिनिधी

इचलकरंजी नगरपरिषदेच्या केंद्र शाळां मधील विद्यार्थ्यांसाठी तीन वर्षांपूर्वी खरेदी केलेल्या सुमारे १८ लाख ७० हजारांच्या टॅब खरेदीत मोठा घोटाळा झाला असल्याचाआरोप राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेश सचिव ,नगरसेवक शशांक बावचकर यांनी केला आहे मुख्याध्यापकांनी मक्तेदारास २०० टॅबचे पैसे अदा केले आहेत, पण प्रत्यक्षात १२५ टॅब प्राप्त झाले असून सॉफ्टवेअर अभावी ते धुळ खात पडून आहेत. या घोटाळ्याची चौकशी होवून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी  नगरसेवक शशांक बावचकर यांनी मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.

इचलकरंजी नगरपरिषदेच्या शिक्षण विभागाकडून विद्यार्थ्यांना संगणकीय ज्ञान मिळावे, यासाठी चार केंद्र शाळांमध्ये प्रत्येकी ५० टॅब पुरवण्याचे नियोजन करण्यात आले. त्यानुसार स्थायी समितीच्या बैठकीत ठराव करण्यात आला. या २०० टॅब खरेदी करण्यासाठी १७ जानेवारी २०१९ रोजी १८ लाख

७० हजारांची रक्कम शहिद भगतसिंग शाळा क्र. २२ , जयभवानी शाळा क्र. ११ , मोतीलाल नेहरू शाळा क्र ३६ , लालबहाद्दूर शास्त्री शाळा क्र. ३४ या चार केंद्र शाळांकडे वर्ग करण्यात आली. पण या कामाबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर नगरसेवक शशांक बावचकर यांनी संबंधित शाळांना भेटी देवून टॅबलेट पुरवणे व लॅब विकसित करणे या कामाची तपासणी करून संबंधित शाळांकडून लेखी अहवाल प्राप्त करून घेतले..

यामध्ये एका टॅबची किंमत ९ हजार ३५० रुपये इतकी असून या किंमतीमध्ये इयत्ता १ ली ते ७ वी च्या विद्यार्थ्यांना लागणारे शैक्षणिक सॉफ्टवेअर देणे मक्तेदारास बंधनकारक होते. या चार केंद्र शाळांनी एकाच कंपनीकडून टॅबची खरेदी करून मक्तेदारास पुर्ण देयके अदा केली आहेत. पण प्रत्यक्षात तीन शाळांमध्ये प्रत्येकी २५ तर एका शाळेमध्ये ५० टॅब पुरवण्यात आले असल्याचा लेखी अहवाल संबंधित मुख्याध्यापकांनी दिला आहे. तसेच या कंपनीने कराराप्रमाणे बंधनकारक असणारे टॅबसाठीचे सॉफ्टवेअर कोणत्याही शाळेत पुरवले नसल्याचेही दिसून आले आहे.

ही बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची असून शिक्षण क्षेत्रात असा गैरकारभार होणे निंदनीय आहे. या कामामध्ये घोटाळा झाल्यासंदर्भातील सर्व कागदोपत्री पुरावे सोबत जोडले असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित मक्तेदार, मुख्याध्यापक यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेश सचिव ,नगरसेवक शशांक बाबचकर यांनी इचलकरंजी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल यांच्याकडे केली आहे.या संदर्भात त्यांनी पत्रकार बैठकीत तपशीलवार माहिती दिली आहे.यावेळी राष्ट्रीय काँग्रेसचे शहराध्यक्ष ,नगरसेवक संजय कांबळे उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post