याचा फायदा नेमका कुणाला झाला ..? याचा शोध घेण्याची पाचव्या स्मृतिदिनी गरज आहे.
प्रेस मीडिया वृत्तसेवा :
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी
(९८५०८ ३०२९०)
८ नोव्हेंबर २०२१ रोजी नोटाबंदीच्या अर्थात पाचशे व एक हजार चलनातील नोटा बंद करण्याचा अत्यंत अविचारी,अविवेकी, मनमानी निर्णयाचा पाचवा स्मृतिदिन होता.हा निर्णय चुकीचा होता हे देशाच्या सर्वांगीण अवस्थेवरून आणि करोडो सर्वसामान्य माणसांच्या कंबरडे मोडण्यातून स्पष्टच झाले आहे. हे सत्ताधाऱ्यांनाही पटले आहेच पण ते मूग गिळून गप्प आहेत. उत्सवप्रिय व इव्हेंटबाज असलेले सरकार गेली चार वर्षे या निर्णयाचा या दिवशी आनंदोत्सव साजरा करत नाही.तसेच त्याचे समर्थक व सत्याशी दुरावा असणारे सोशल मीडियापटूही साजरा करत नाहीत.या निर्णयाबाबत चकार शब्द काढत नाहीत.
केवळ पन्नास दिवसात अर्थव्यवस्था सुरळीत होईल असे त्यावेळी सांगितले होते.तसेच या निर्णयामुळे काळा पैसा संपुष्टात येईल, अर्थव्यवस्था कॅशलेस होईल, अधिक मूल्याच्या नोटा रद्द केल्याने काळा पैसा कमी होईल, बनावट नोटा संपुष्टात येतील आणि दहशतवादाचे कंबरडे मोडेल अशी पाच उद्दीष्ट्ये सांगितली होती.यामध्ये सरकारने स्वतः दोन हजाराची नोट छापून आपल्याच एका उद्दिष्टाला त्वरित हरताळ फासला. जुन्या नोटांतील ९९.३ टक्के चलन पुन्हा बँकेत जमा झाल्याने गवगवा केलेला काळा बाहेर आलाच नाही. एकूण पैकी केवळ १० हजार ७२० कोटी रुपये बँकिंग यंत्रणेत परत आले नाहीत. कॅशलेसचेही हसेच झाले आहे.नोटबंदीपूर्वी नागरिकांकडे १७.७४ लाख कोटी रुपयांचे चलन होते.त्यात आज अठ्ठावन्न टक्के वाढ होऊन ते २८.३० लाख कोटी झाले आहे.नोटबंदी नंतर सापडलेल्या बनावट नोटांमध्ये छप्पन्न टक्के नोटा दोन हजाराच्या आहेत.म्हणजे अधिक मूल्यांच्या बनावट नोटांचे प्रमाण वाढलेच आहे.नोटबंदीपूर्वी पाचशे व एक हजारच्या नोटांचे एकूण नोटांच्या तुलनेत ८५ टक्के मूल्य होते.आज दोन हजार व पाचशेच्या नोटांचे प्रमाण ८५.७ टक्के आहे.तसेच दहशतवाद कमी झाला हे म्हणणे चीनने आमच्या भूमीत आक्रमण केले नाही,घरे- रस्ते बांधले नाहीत असे फेकण्यासारखे आहे.
आपल्याच नागरिकांचे कंबरडे मोडणाराआणि त्यांना मुळापासून उद्ध्वस्त करणारा हा निर्णय ठरला.अनेक दुर्घटना या निर्णयामुळे झाल्या.घराच्या खरेदी-विक्री व्यवहारापासून शेत जमिनीच्या खरेदी-विक्री व्यवहारापर्यंत,घरबांधणी पासून लघु उद्योग उभारणी पर्यंत,शेती व्यवसायापासून किराणा व्यवसायापर्यंत प्रत्येक क्षेत्रात या निर्णयाचे करोडो लोक शिकार झाले.त्यांचे मोठे नुकसान झाले.त्यांना उभारी देणारा एकही निर्णय सरकार गेल्या पाच वर्षात घेऊ शकले नाहीच.उलट शेतकरी,कामगार,नोकरदार यांना आणखी खाईत ढकलणारी,बेलगाम महागाईत ढकलणारी धोरणे आखून जगणे कठीण केले.तसेच अजूनही जुन्या नोटा बदलून सापडण्याची,त्या बदलून देण्याची यंत्रणा असल्याची चर्चा वृत्तपत्रात येत असते.याचा अर्थ काय ? नोटबंदीच्या निर्णयापासूनच हा निर्णय जाहीर होण्यापूर्वीच काही लोकांना माहीत होता इथपासून तो जाहीर होईपर्यंत रिझर्व्ह बँकेलाच माहीत नव्हता अशा विविध चर्चा सुरू आहेत.अनेकांना उद्धवस्त करणारा हा निर्णय होता.याचा फायदा नेमका कुणाला झाला याचा शोध घेण्याची पाचव्या स्मृतिदिनी गरज आहे.