लोक सहभागातून महावृक्षारोपण उपक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
प्रेस मीडिया वृत्तसेवा :
इचलकरंजी / प्रतिनिधी
इचलकरंजी शहरातील शिवाजीराव खवरे भाजी मार्केटमध्ये व्हिजन इचलकरंजी या सामाजिक संस्थेतर्फे लोकसहभागातून महावृक्षारोपण उपक्रम राबविले जात आहे. याअंतर्गत आज रविवारी सकाळी ४० झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. गेल्या दोन महिन्यात तीन टप्प्यात एकूण १५० झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले असून त्याची निगा राखण्याचे व संवर्धनाचे कामही व्हिजन इचलकरंजी या संस्थेकडून करण्यात येत आहे.
इचलकरंजी शहरातील उजाड अशा खवरे मार्केट येथे येणाऱ्या नागरिकांना व व्यापाऱ्यांना सावली मिळावी, शहर हरित करण्याच्या उद्देशाने व्हिजन इचलकरंजी या सामाजिक संस्थेने लोकसहभागातून १५ फूट उंचीची देशी सुमारे ३५० वृक्षारोपण करण्याचे काम हाती घेतले आहे. हे काम टप्प्याटप्प्याने सुरू असून आज रविवारी २८ नोव्हेंबर रोजी तिसरा टप्पा पूर्ण झाला. तिसऱ्या टप्प्यावेळी व्हिजन इचलकरंजीसह खंडेलवाल नवयुवक मंडळ, इचलकरंजी परिसर मुद्रक संघ, दोस्ती दिलसे दिलतक ग्रुप, गिरिभ्रमण ग्रुप, व्यंकटराव हायस्कूल पालक संघ आदींचे प्रतिनिधी व कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.
या उपक्रमाची सुरुवात वसुंधरेची हरित शपथ घेऊन करण्यात आली. या उपक्रमात सर्व वयोगटातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला असून गेल्या दोन महिन्यात १५० झाडांचे वृक्षारोपण झाले आहे. माझी वसुंधरा अभियान अंतर्गत आयोजित महावृक्षारोपण उपक्रमावेळी पालिकेचे अधिकारी संपत चव्हाण, सचिन पाटील, नितीन देसाई, शुभांगी जोशी यांची उपस्थिती लाभली.