घरेलू कामगारांच्या न्याय हक्कासाठी पुन्हा संघटीत लढा उभारणार

 ज्येष्ठ कामगार नेते दत्ता माने यांची माहिती


प्रेस मीडिया वृत्तसेवा :

इचलकरंजी / प्रतिनिधी

घरेलू कामगारांना थकीत कोविड अनुदान मिळावे ,त्यांच्यासाठी कल्याणकारी मंडळ पूर्ववत सुरु करावे यासह अन्य प्रलंबित मागण्या व न्याय हक्कासाठी लालबावटा प्रणीत घरेलू कामगार संघटनेच्या वतीने पुन्हा संघटीतपणे लढा उभारणार असल्याची माहिती ज्येष्ठ कामगार नेते दत्ता माने यांनी दिली.

इचलकरंजी शहरात सुमारे सहा हजार नोंदणीकृत घरेलू कामगार आहेत.पण ,२०१४ साली तत्कालीन सेना - भाजप युती सरकारने सत्तेवर येताच घरेलू कामगारांसाठी सुरु असलेले कामगार कल्याणकारी मंडळ ,जनश्री विमा योजना ,५५ वर्षांवरील कामगारांना वार्षिक १० हजार रुपये सन्मान धन ,विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती ,कामगार मयत झाल्यास त्याच्या अंत्यविधीसाठी दोन हजार रुपये अशा सर्व सुविधा बंद केल्या असल्याचे लालबावटा प्रणीत घरेलू कामगार संघटनेचे ज्येष्ठ कामगार नेते दत्ता माने यांनी सांगून परिणामी ,या कामगारांना सन्मान धन , आरोग्य ,अपघात विमा ,पेन्शन व मुलांसाठी शिष्यवृत्ती अशा कोणत्याच शासकीय सुविधांचा लाभ मिळत नसल्याने त्यांचे जगणे बेभरवशाचे होवून विविध समस्यांचा देखील सामना करावा लागत आहे.

त्यामुळे प्रलंबित मागण्या मार्गी लागून या कामगारांना न्याय मिळावा ,यासाठी लालबावटा प्रणीत घरेलू कामगार संघटनेच्या वतीने सातत्याने आंदोलन ,मोर्चे काढून शासनाला जाग आणण्याचा प्रयत्न सुरु ठेवला असल्याचे सांगितले. तसेचअसे असूनही तत्कालीन सेना - भाजप युती सरकारने या मागण्यांकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष करत आपले खरे रूप दाखवून दिले होते.हे सरकार पायउतार होवून २०१९ साली शिवसेना - राष्ट्रीय काँग्रेस - राष्ट्रवादी या पक्षांचे महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आले आहे. या सरकारकडे घरेलू कामगार संघटनेने पुन्हा प्रलंबित मागण्या मार्गी लागाव्यात  ,यासाठी लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन ,मोर्चे ,निवेदन देवून असंघटित क्षेत्रातील कामगारांची संघटीत ताकद दाखवून दिली आहे.याचाच परिणाम म्हणजे नोंदणीकृत घरेलू कामगारांना कोविड अनुदान म्हणून दीड हजार रुपये मिळाले आहेत. पण ,यामध्ये २०११ ते २०१४ व नव्याने नोंदणीकृत असलेल्या घरेलू कामगारांना या कोविड अनुदानाचा लाभ मिळाला नाही. तो तातडीने मिळावा ,यासह सर्व नोंदणीकृत ५५ वर्षांवरील

घरेलू कामगारांना पूर्वीप्रमाणे दहा हजार रुपये सन्मान धन मिळावे ,कामगार कल्याणकारी मंडळ पूर्ववत सुरु करावे ,जनश्री विमा योजना सुरु करावी ,६० वर्षांवरील कामगारांना मासिक २ हजार रुपये पेन्शन मिळावी ,कामगारांच्या मुलांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळावी या प्रमुख मागण्या मार्गी लागाव्यात यासाठी इचलकरंजी शहरातील लालबावटा प्रणीत घरेलू कामगार संघटना विविध मार्गाने शासन दरबारी पाठपुरावा करत असल्याचे कामगार नेते दत्ता माने यांनी सांगितले. तसेच कोविड अनुदानाच्या लाभापासून वंचित असलेल्या लाभार्थ्यींना याचा लाभ मिळावा यासाठी देखील संघटना प्रयत्नशील असल्याचे सांगून राज्यातील महाविकास आघाडी सरकारने आता घरेलू कामगारांना सर्व योजनांच्या माध्यमातून सुविधांचा लाभ देवून त्यांचे जगणे सुसह्य करावे.अन्यथा लोकशाहीच्या मार्गान पुन्हा संघटित लढा उभारुन न्याय हक्क पदरात पाडून घेतल्याशिवाय आम्ही आता स्वस्थ बसणार नाही ,असा इशाराही कामगार नेते दत्ता माने यांनी दिला.

यावेळी लालबावटा संघटनेचे ज्येष्ठ नेते शिवगोंड खोत ,लालबावटा बांधकाम कामगार संघटनेचे नेते भरमा कांबळे ,आशा वर्कर्स संघटनेचे नेते सदा मलाबादे ,नूरमहंमद बेळकुडे ,सुभाष कांबळे ,धनाजी जाधव आदी उपस्थित होते.


जगदीश अंगडी : कार्यकारी संपादक :

Post a Comment

Previous Post Next Post