ऐन थंडीच्या दिवसात रस्त्यावरच चुल पेटवून हे निराधार पोटाची भूक भागवत आहेत.
प्रेस मीडिया वृत्तसेवा :
इचलकरंजी / प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य कष्टकरी शेतमजूर संघटनेचे निराधार योजनेतील प्रलंबित मागणीसाठी इचलकरंजीत आज गुरुवारी दुसऱ्या दिवशीही ठिय्या आंदोलन सुरु ठेवून गुरूवारी भीक मागो आंदोलन करणात आले.
यावेळी येथील प्रांत कार्यालयाच्या दुतर्फा लांबलचक रांगेत बसून मागण्यांची भिक मागण्यात आली. शासनाच्या विरोधात तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
शिरोळ तालुक्यातील पेन्शन लाभार्थ्यांची तहसील कार्यालयातून गहाळ झालेली ९२ प्रकरणे जोपर्यंत मंजूर होत नाहीत तोपर्यंत ठिय्या आंदोलन सुरूच राहील असा इशारा महाराष्ट्र राज्य कष्टकरी शेतमजूर संघटनेच्या वतीने देण्यात आला होता.असे असूनही याबाबत प्रशासन पातळीवर कोणतीही हालचाल झाली नाही. त्यामुळे विविध मागण्यांसाठी कष्टकरी शेतमजूर संघटनेने काल बुधवारपासून इचलकरंजीत प्रांत कार्यालय चौका मध्ये बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. गेली दोन महिने झाले मागण्यांसाठी संघर्ष करूनही शासनाने याकडे साफ दुर्लक्ष केल्याने हजारो निराधारांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. प्रांत कार्यालयासमोर मागण्यांसाठी ठिय्या मारण्यात आला आहे. ऐन थंडीच्या दिवसात रस्त्यावरच चुल पेटवून हे निराधार पोटाची भूक भागवत आहेत.
गुरूवारी दुपारी दोनच्या सुमारास विविध गावातून जमलेल्या शेकडो निराधारांनी प्रांत कार्यालयासमोर भीक मागो आंदोलन केले. प्रशासनाच्या विरोधात जाेरदार घोषणाबाजी करत तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.या वेळी निराधार योजनतील पात्र लाभार्थी व संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते आक्रमक झाल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
या आंदोलनात कष्टक-यांचे नेते सुरेश सासणे, सामाजिक कार्यकर्ते विश्वास बालिघाटे, अलाउद्दीन नदाफ, सदाशिव कुंभार, महावीर मगदूम, शोभा पाणदारे, अब्दुल कादर मुजावर, शामराव भानुसे, मल्लाप्पा कोरे, भिकू काळगे, सरोजिनी मोहिते, नवसाबाई कांबळे आदींसह महिला व जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.