दुपारनंतर नगरपरिषदेतील कामकाज पूर्ववत सुरु
प्रेस मीडिया वृत्तसेवा :
इचलकरंजी / प्रतिनिधी ;
इचलकरंजी नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी ऑक्टोबर महिन्याच्या पगारासाठी तीन दिवसांपासून सुरु केलेले कामबंद आंदोलन चर्चेअंती 95 टक्के कर्मचार्यांचा पगार सायंकाळपर्यंत जमा करण्याची हमी मिळाल्यानंतर मागे घेण्यात आले. तर खातेप्रमुख व केडर कर्मचार्यांना घरफाळा जमा होईल त्यानुसार पगार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतची घोषणा नगराध्यक्षा सौ. अलका स्वामी यांनी केली. त्यामुळे दुपारनंतर नगरपरिषदेतील कामकाज पूर्ववत सुरु झाले.
इचलकरंजी नगरपरिषद प्रशासनाकडून सेवानिवृत्त कर्मचार्यांची थकीत देणी भागविण्यासाठी राखीव निधीतील रक्कम खर्च करण्यात आली. परंतु त्यासाठीची तरतूद करताना नगरपरिषद प्रशासनाला कसरत करावी लागत आहे. त्यातच शासनाकडून मिळणार्या सहाय्यक अनुदानात कपात झाल्याने खर्चाचा मेळ घालताना नगरपरिषदेच्या तिजोरीत खडखडाट झाला आहे. सफाई कर्मचारी वगळता 425 नगरपरिषद कर्मचार्यांचे ऑक्टोबर महिन्याचे वेतन थकीत राहिले आहे. ते मिळावे या मागणीसाठी सोमवारपासून कर्मचार्यांनी काम बंद आंदोलन सुरु केले केल्याने नगरपरिषदेतील संपूर्ण कामकाज ठप्प झाले होते. या आंदोलनाची व्याप्ती वाढविण्यासाठी सफाई कर्मचारीही आंदोलनात सहभागी होणार होते.
या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी मुख्याधिकारी प्रदीप ठेंगल यांच्या दालनात वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी, नगरसेवक रविंद्र माने यांच्यासह कर्मचारी प्रतिनिधींच्या झालेल्या बैठकीत सर्वमान्य तोडगा काढण्यात आला. त्यामध्ये खातेप्रमुख व राज्य संवर्गातील कर्मचारी वगळता उर्वरीत सर्वच कर्मचार्यांचा ऑक्टोबर महिन्याचा पगार देण्याचा निर्णय झाला. त्यामुळे चारशेहून अधिक कर्मचार्यांच्या वेतनाचा प्रश्न मार्गी लागला आहे. सफाई कर्मचारी वगळता उर्वरीत कर्मचार्यांच्या वेतनासाठी 2 कोटी 10 लाखांची गरज होती. पैकी प्रशासनाने दोन दिवसात प्रयत्न करुन 1 कोटी 70 लाखांचा निधी उपलब्ध केला आहे. दरम्यान, जशी घरफाळा वसुली होईल, त्याप्रमाणे खातेप्रमुख व राज्य संवर्गातील कर्मचार्यांचा पगार करण्याचा निर्णय घेण्यात आला. हा तोडगा कर्मचारी संघटना कृती समितीने मान्य करीत आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा केली.
नगराध्यक्षा सौ. अलका स्वामी, मुख्याधिकारी प्रदीप ठेंगल यांनी नगरपरिषदेच्या प्रवेशद्वारासमोर सुरु असलेल्या आंदोलनात येत निर्णय जाहीर केला. तसेच यापुढे पगाराच्या प्रश्नावर कटुता निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन नगराध्यक्षा सौ. स्वामी यांनी केले. यावेळी नगरसेवक रविंद्र माने, राहुल खंजिरे, प्रकाश मोरबाळे, अशोक स्वामी, भाऊसाहेब आवळे, महादेव गौड आदी उपस्थित होते.