महिन्याभरात दुस-यांदा मोका कारवाईने गुन्हेगारी क्षेत्रात मोठी खळबळ.
इचलकरंजी / प्रतिनिधी
प्रेस मीडिया वृत्तसेवा :
इचलकरंजी शहरातील पोलीस रेकाँर्डवरील कुख्यात जर्मनी टोळीच्या सहाजणांवर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईतील सर्व संशयीत हे आदित्य बळवंत महाव्दार आत्महत्त्या प्रकरणातील आहेत. त्यांच्यावर शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा दाखल आहे. महिन्या भरात शहरात सलग दुसऱ्यांदा कुख्यात गुन्हेगारी टोळीवर पोलिसांनी मोका कारवाई केल्याने गुन्हेगारी क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
इचलकरंजी शहरातील पोलीस रेकाँर्डवरील जर्मनी टोळीवर मारहाण करणे, धमकी देणे, आर्थिक लाभासाठी दहशत माजवणे यांसारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याने यापूर्वी अविनाश जर्मनी याच्या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई केली. त्यानंतरही या टोळीचे कारनामे सुरूच असल्याने आदर्श उर्फ आदया जर्मनी टोळीवर दुसर्यांदा मोक्का अंतर्गत कारवाई केली. त्यानंतर आता जर्मनी टोळीतील अभिषेक इराप्पा तेरणे ,
सुनिल अशोक कोंडुगळे , अनिकेत सुभाष बडवे , रवी ज्ञानदेव डोंगरे , पवन उर्फ तेजस किशोर सरोदे , तेजस सातगोंडा कांबळे या सहा गुन्हेगारांवर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.पोलीस रेकाँर्डवरील जर्मनी टोळीतील वरील सर्व संशयित आरोपींनी आदित्य महाद्वार याच्याकडे १ लाखाची खंडणी मागीतली होती. तर त्याच्याकडून जबरीने २५ हजार रुपये व सोन्याची अंगठी काढून घेतली होती. आणखी २५ हजारांची खंडणीची मागणी करुन त्याला कुटुंबासह मारण्याची धमकी या टोळीकडून देण्यात आली होती.
त्यांच्या या त्रासाला कंटाळून आदित्यने ७ नोव्हेंबरला राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली होती. त्याची सुसाईट नोट पोलिसांच्या हाती लागली होती. त्यानुसार आदित्यच्या आईच्या तक्रारीनंतर संशयितांवर गुन्हा नोंद केला होता. या गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली असून सर्वजण कारागृहात आहेत. या टोळीवर 22 दिवसात जलदगतीने पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे यांच्या मार्फत विशेष पोलीस महानिरिक्षक मनोजकुमार लोहिया यांच्याकडे मोका अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव सादर केला होता. त्याला आज मंगळवारी मंजुरी देण्यात आली.या टोळीचे अन्य म्होरके सध्या कारागृहात आहेत. याबाबतची कारवाई पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे, अप्पर पोलीस अधिक्षक जयश्री गायकवाड, उपाधिक्षक बी.बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक श्रीकांत पिंगळे, प्रकाश गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक भालचंद्र देशमुख, पोलीस नाईक सागर चौगले, महेश पाटील यांनी केली.