बांधकाम कामगारांचे आज मंत्री मुश्रीफ यांच्या निवासस्थानासमोर खर्डा भाकरी खाऊन अनोखे आंदोलन


कामगार नेते राजेंद्र निकम यांची माहिती..


प्रेस मीडिया वृत्तसेवा :

इचलकरंजी / प्रतिनिधी :

राज्यातील महाविकास आघाडी सरकारने बांधकाम कामगारांना दिवाळी सणासाठी सानुग्रह अनुदान म्हणून ५ हजार रुपये देण्याचे आश्वासन पाळले नाही.त्या मुळे शासनाच्या निषेधार्थ उद्या रविवारी कागलमध्ये कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानासमोर खर्डा भाकरी खाऊन शिळी दिवाळी साजरी करण्यात येण्यात असल्याचा इशारा महाराष्ट्र बांधकाम सेनेचे संस्थापक राजेंद्र निकम यांनी दिला.

मागील दोन वर्षांपासून कोरोना महामारी ,लाँकडाऊनच्या परिस्थितीमुळे उद्योग - व्यवसायातील काम बंद पडून त्याचा आर्थिक उलाढालीवर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे हाताला अपेक्षित काम नसल्याने कष्टकरी ,कामगार वर्गाला अनेक आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यात दोन वेळचे कुटूंबाचे पोट भरणे देखील मुश्कील झाले आहे. या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेवून बांधकाम कामगारांना दिवाळी सण साजरा करण्यासाठी प्रत्येकी १० हजार रुपये

सानुग्रह अनुदान देण्याची मागणी महाराष्ट्र बांधकाम सेनेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष राजेंद्र निकम यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने राज्याचे कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे एका निवेदनाव्दारे केली होती. त्यानुसार त्यांनी बांधकाम कामगारांना ५ हजार रुपये दिवाळी सानुग्रह अनुदान देण्याची तात्काळ कार्यवाही करु ,असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले होते. परंतू ,दिवाळी सण सुरु झाला तरी देखील या आश्वासनाची पूर्तता न झाल्याने सानुग्रह अनुदानाअभावी  दिवाळी सण कसा साजरा करायचा ,असा प्रश्न राज्या बरोबरच इचलकरंजी शहरातील बांधकाम कामगारांना सतावत आहे. त्यामुळे बांधकाम कामगारांच्या भावनांशी खेळणाऱ्या राज्यातील महाविकास आघाडी सरकारने बांधकाम कामगारांना दिवाळी सणासाठी सानुग्रह अनुदान म्हणून ५ हजार रुपये देण्याचे आश्वासन पाळले नाही.

त्यामुळे शासनाच्या निषेधार्थ उद्या रविवारी कागलमध्ये मनसेचे नेते पुंडलीकराव जाधव ,महाराष्ट्र बांधकाम कामगार सेनेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र निकम ,रजनीकांत माने ,राहुल दवडते ,सद्दाम मुजावर यांच्या नेतृत्वाखाली कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानासमोर खर्डा भाकरी खाऊन शिळी दिवाळी साजरी करण्यात येणार आहे. तत्पूर्वी ,सकाळी ११ वाजता कागल एसटी स्टँड परिसरात सर्व बांधकाम कामगार ,त्यांचे कुटूंब व कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकत्र जमून तेथून मोर्चाने घोषणा देत मंत्री हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानासमोर येणार असल्याचे महाराष्ट्र बांधकाम सेनेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र निकम यांनी सांगितले.

तसेच या अनोख्या आंदोलनात बांधकाम कामगारांचे सर्व कुटूंब त्यामध्ये महिला ,लहान मुले देखील मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचे सांगून या आंदोलनाची दखल घेवून तात्काळ दिवाळी सानुग्रह अनुदान देण्याची कार्यवाही न झाल्यास भविष्यात यापेक्षा तीव्र स्वरुपाचे आंदोलन करुन मंत्री हसन मुश्रीफ व राज्य सरकारमधील सर्व मंत्री व अधिका-यांना जाग आणल्याशिवाय राहणार नाही ,असा सज्जड इशारा देखील त्यांनी दिला.

यावेळी महाराष्ट्र बांधकाम कामगार सेनेचे सर्व पदाधिकारी ,सदस्य उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post