सर्व श्रमिक संघाचे अतुल दिघे यांची माहिती
प्रेस मीडिया वृत्तसेवा :
इचलकरंजी / प्रतिनिधी :
देशातील सर्व इ.पी.एफ पेन्शनरांना दरमहा ९ हजार रुपये पेन्शन व महागाई भत्ता मिळावा यासह अन्य प्रमुख मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्षकरुन अकार्यक्षम ठरलेल्या केंद्र सरकारमधील भाजप पक्षाच्या विरोधात येत्या १६ नोव्हेंबर रोजी राज्यभरात पेन्शनर विश्वासघात दिवस आंदोलन करण्यात येणार आहे. याचाच एक भाग म्हणून त्याच दिवशी कोल्हापूरात सर्व पेन्शनर एकत्र जमून मोर्चा काढून भाजपाच्या जिल्हा कार्यालयाला टाळे सुपूर्द करण्यात येणार असल्याचे सर्व श्रमिक संघाचे प्रमुख अतुल दिघे यांनी इचलकरंजीत लखीमपूर खेरी शहिद किसान अस्थिकलश अभिवादन कार्यक्रमात बोलताना सांगितले.
इचलकरंजी येथे सर्व श्रमिक संघ व श्रमिक शेतकरी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने समाजवादी प्रबोधिनीच्या सभागृहात लखीमपूर खेरी शहिद किसान अस्थिकलश अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.यावेळी ज्येष्ठ कामगार नेते दत्ता माने ,सर्व श्रमिक संघाचे प्रमुख अतुल दिघे ,समाजवादी प्रबोधिनीचे प्रसाद कुलकर्णी ,अनंत कुलकर्णी ,सामाजिक कार्यकर्ते बजरंग लोणारी ,शिवाजी साळुंखे यांच्या प्रमुख उपस्थितीत लखीमपूर खेरी शहिद किसान अस्थि कलशाचे दर्शन घेवून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रसाद कुलकर्णी ,बजरंग लोणारी ,शिवाजी साळुंखे यांच्यासह अनेक मान्यवरांनी आपल्या मनोगतात कामगार व शेतकरी विरोधी धोरण राबवून भांडवलदारांना पायघड्या घालणा-या केंद्रातील भाजप सरकार विरोधात जोरदार टिका केली.तसेच हे भाजप सरकार आता हुकूमशाही पध्दतीने कारभार करत देशातील सर्वसामान्य नागरिकांवर अन्याय ,अत्याचार करत असल्याचे सांगून हे वेळीच रोखण्यासाठी पुन्हा एकदा संघटित लढा उभारुन तो यशस्वी करावा ,असे आवाहन केले.
यावेळी सर्व श्रमिक संघाचे प्रमुख अतुल दिघे यांनी केंद्रातील भाजप सरकारची कुटील राजनिती ,कष्टकरी वर्गाला भरडून टाकण्याचे धोरण आणि त्यातून हुकूमशाही कारभाराकडे सुरु असलेली वाटचाल याचा विस्तृतपणे परामर्श घेतला.तसेच पेन्शनरांच्या भावनांशी खेळणाऱ्या केंद्र सरकार मधीलभाजप पक्षाची अकार्यक्षमता सिद्ध झाल्याचे सांगून त्या विरोधात येत्या ६ नोव्हेंबर रोजी राज्यभरात पेन्शनर विश्वासघात दिवस आंदोलन करण्यात येणार आहे. याचाच एक भाग म्हणून त्याच दिवशी कोल्हापूरात सर्व पेन्शनर एकत्र जमून मोर्चा काढून भाजपाच्या जिल्हा कार्यालयाला टाळे सुपूर्द करण्यात येणार असून यावेळी संबंधितांनी टाळे न स्विकारल्यास आम्ही स्वतः टाळे ठोकू ,असा इशारा दिला.यावेळी १६ नोव्हेंबरचा पेन्शनर विश्वासघात दिवस यशस्वी करण्याचा एकमताने निर्धार करण्यात आला.
या कार्यक्रमास सर्व श्रमिक संघाचे धोडींबा कुंभार ,सुनील बारवाडे, अजिज शेडबाळे , नामदेव बडवे ,राजू शेलार ,बाळू भिसे ,बबन आवळे ,विक्रम शिंगाडे, शंकरराव सरदेसाई यांच्यासह कामगार ,शेतकरी, पेन्शनर व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.