शिरढोण मधील शेतकऱ्यांचे प्रांताधिका-यांकडे मागणीचे निवेदन सादर.
प्रेस मीडिया वृत्तसेवा :
इचलकरंजी / प्रतिनिधी
शिरोळ तालुक्यातील शिरढोणमधील पूरग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने जाहीर केलेल्या रिलायन्स कंपनीकडून पीक विम्याची रक्कम तात्काळ एकरकमी मिळावी, या मागणीसाठी आज गुरुवारी सामाजिक कार्यकर्ते विश्वास बालिघाटे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने इचलकरंजीत प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांची भेट घेतली. यावेळी आपल्या मागण्यांचे निवेदन त्यांना सादर करुन गा-हाणे मांडले.
यंदाच्या वर्षी २००५ व २०१९ या वर्षीप्रमाणेच क्रुष्णा व पंचगंगा नदीला मोठ्या प्रमाणात महापूर येवून त्याचा सर्वाधिक नुकसानीचा फटका शिरोळ तालुक्यातील नदीकाठच्या गावांना बसला आहे.त्यात शासनाने जाहीर केलेल्या रिलायन्स कंपनीकडून शिरढोण येथील शेतकऱ्यांनी सोयाबीन व भुईमूग या खरीप पिकासाठी विमा घेतला होता. मात्र, महापुरामुळे संपूर्ण पिकांचे १०० टक्के नुकसान झाले आहे. याबाबत पंचनामाही कंपनीकडून झाला आहे. याला जवळपास ४ महिन्यांचा कालावधी उलटला असूनही अद्याप कंपनीकडून कोणतीही ठोस मदत मिळाली नाही. सततच्या महापुरामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. याचा विचार करून रियालन्स कंपनीकडून शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम तात्काळ एक रकमी मिळावी, अशी मागणी शिरढोण मधील शेतकऱ्यांच्या वतीने आज गुरुवारी सामाजिक कार्यकर्ते विश्वास बालिघाटे यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने इचलकरंजीत प्रांताधिकारी डाँ.विकास खरात यांच्याकडे निवेदन सादर करुन केली.
या वेळी पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर ६ डिसेंबर पर्यंत जमा न झाल्यास ७ डिसेंबर रोजी प्रांत कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा देखील देण्यात आला.
या शिष्टमंडळात बाबुराव कोईक, रावसाहेब यमकनमर्डे, महावीर माणगावे, महावीर हासुरे, शक्ती पाटील, कुमार माणगावे यांच्यासह अन्य शेतकरी बांधवांचा समावेश होता.