शिरोळ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी जिल्हा बँकेची निवडणूक लढवण्याचा निर्णय.....दत्त कारखान्याचे चेअरमन आणि उमेदवार गणपतराव पाटील यांचे प्रतिपादन

 



प्रेस मीडिया वृत्तसेवा :

शिरोळ /प्रतिनिधी:

तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी गेल्या काही वर्षात आपण विविध प्रकल्प राबवले आहेत. क्षारपड मुक्त जमीन, सेंद्रिय शेती, कमी खर्चात जास्त ऊस उत्पादन, गो परिक्रमा या माध्यमातून शेतकऱ्यांचे हित साधले जाईल याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला. याला यश मिळाले आहे. तालुक्यात क्षारपड जमिनीचा प्रश्न गंभीर आहे. तो सोडवण्यासाठी जिल्हा बँक आणि नाबार्डची गरज आहे. त्या ठिकाणी जाऊन शासनाच्या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळावा याकरिता जिल्हा बँकेची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. शेतकऱ्यांची प्रगती होण्याकरिता आपणही माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून पाच वर्षे जिल्हा बँकेत काम करण्याची संधी द्यावी, असे आवाहन दत्त कारखान्याचे चेअरमन आणि उमेदवार गणपतराव पाटील यांनी केले. प्रचार दौऱ्यादरम्यान सोसायटी ठराव धारकांच्या समोर ते बोलत होते.

  शिरोळ तालुक्यातील क्षारपड जमीन श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील हेच क्षारपड मुक्त करण्यासाठी प्रयत्न करून शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती साधतील असा विश्वास शेतकऱ्यांचा आहे. याकामी गणपतराव पाटील यांना कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि नाबार्डची साथ आवश्यक आहे.  गणपतराव पाटील यांच्या कार्यपद्धतीवर शेतकऱ्यांचा विश्वास असल्याने या निवडणुकीत त्यांचा विजय निश्चित आहे, असे प्रतिपादन माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले. जि. प. सदस्य डॉ.अशोकराव माने म्हणाले, गणपतराव पाटील यांनी सहकारी संस्थांच्या माध्यमातून जनसेवेचे व्रत स्वीकारून सर्वसामान्यांची प्रगती साधण्याचा सातत्याने प्रयत्न सुरू ठेवला आहे. शेतकऱ्यांचे सक्षम नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. सर्वसमावेशक चेहरा म्हणून त्यांना जिल्हा बँकेच्या निवडणुकीत उभे केले आहे. माजी आमदार उल्हास पाटील, माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती सावकर मादनाईक, कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती महादेव धनवडे, जिल्हा बँकेचे माजी चेअरमन विठ्ठलराव नाईक निंबाळकर, गोकुळचे माजी चेअरमन दिलीपराव पाटील, शिरोळ तालुका भाजपा नेते अनिलराव यादव, मयूर उद्योग समूहाचे प्रमुख डॉ. संजय पाटील यांनीही ठरावधारकांच्या भेटी घेत त्यांच्यासमोर आपली भूमिका स्पष्ट करताना गणपतराव पाटील यांनी केलेल्या कार्याची माहिती दिली. त्यांना जिल्हा बँकेच्या संचालक मंडळात शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी देण्यासाठी आपण सर्वांनीच त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन केले.

    कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने शिरोळ तालुक्यातील सोसायटी मतदार संघातून गणपतराव पाटील यांनी उमेदवारी घोषित करून प्रचारात आघाडी घेत तालुक्यातील सर्व ठराव धारकांच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली आहे. पाटील यांच्यासोबत नृसिंहवाडीचे माजी सरपंच धनाजीराव जगदाळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते चंगेजखान पठाण, शिरोळ तालुका भाजपा अध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर, शिरोळ तालुका शिवसेनाप्रमुख वैभव उगळे, भारतीय जनता युवा मोर्चा कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज यादव, काँग्रेसचे शिरोळ तालुका अध्यक्ष सर्जेराव शिंदे, नेते गुंडूनाना दळवी, दत्त कारखान्याचे संचालक शेखर पाटील, महेंद्र बागे, दरगू गावडे, संजय पाटील, धनाजी पाटील नरंदेकर, अशोकराव कोळेकर, शिरोळचे नगरसेवक विठ्ठल पाटील, दत्त ग्राहक भांडारचे चेअरमन दामोदर सुतार यांच्यासह शिरोळ तालुक्यातील विविध पक्षांचे पदाधिकारी, नेतेमंडळी, कार्यकर्ते प्रचार दौऱ्यात सहभागी होऊन गणपतराव पाटील यांना विजयी करण्याचे अवाहन करीत आहेत. मंगळवारी तालुक्यातील जांभळी, टाकवडे, शिरढोण, तेरवाड, हेरवाड, अब्दुललाट, लाटवाडी, शिरदवाड, शिवनाकवाडी या गावातील सोसायटी ठराव धारकांच्या भेटी घेण्यात आल्या.

  या प्रचार दौऱ्यादरम्यान गणपतराव पाटील आणि सर्वपक्षीय नेते मंडळींचे सर्वत्र जल्लोषात फटाके फोडून, औक्षण करून स्वागत करण्यात आले. प्रचार दौऱ्यादरम्यान मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता जिल्हा बँकेच्या निवडणुकीत गणपतराव पाटील यांचा विजय निश्चित मानला जात आहे.

Post a Comment

Previous Post Next Post