प्रेस मीडिया वृत्तसेवा :
शिरोळ/प्रतिनिधी :
येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांच्या ऊसाला एकरकमी प्रति टन २९२० रुपये एफ. आर. पी. देणार असल्याची घोषणा कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी बॉयलर प्रदीपन प्रसंगी शुक्रवारी केली. शेतकऱ्यांचे व कामगारांचे हित जपणे हेच दत्त कारखान्याचे ब्रीद असून सर्वांना पुढे घेऊन जाण्याची दृष्टी ठेवली आहे. महापुरात बुडीत झालेल्या उसाला गाळपासाठी प्राधान्य देणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
प्रारंभी कारखाना संचालक इंद्रजीत पाटील, सौ.राजश्री पाटील व मान्यवरांच्या हस्ते पूजाविधी आणि बॉयलर प्रदीपन करण्यात आले. येत्या २१ ऑक्टोबर पासून कारखाना सुरु करण्यात येणार असल्याचे सांगून अध्यक्ष गणपतराव पाटील म्हणाले, कामगारांना दिवाळीला २१ टक्के बोनस एकरकमी देण्यात येणार आहे. यावर्षी साडे ११ ते १२ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करण्याचे उद्दीष्ट असून १२.१० च्या वर रिकव्हरी होईल असा अंदाज आहे. गेल्यावेळी उर्जांकुरच्या माध्यमातून १६ कोटी युनिट वीजनिर्मिती झाली असून त्यातील ४ कोटी युनिट वापरुन उर्वरित १२ कोटी युनिट वीज ग्रीडला दिली आहे. गणपतराव पाटील पुढे म्हणाले, शेती शास्त्रज्ञ व शेती तज्ज्ञांची कार्यशाळा आयोजित करून यामध्ये महापूर क्षेत्रात कोणती नवी पिके घेता येतील यावर सखोल चर्चा करण्यात आली आहे. आंबा, चिकू आणि बीट यांचे प्रायोगिक तत्त्वावर उत्पन्न घेण्यास सुरुवात झाली आहे. ५० एकरावर बीटाचे उत्पादन घेऊन त्याचे गाळप करण्यात येणार आहे. बचत गटांच्या १५० महिलांच्या माध्यमातून देशी वाणांचे संगोपन करण्याचे कामही सुरू असून लवकरच बीज बँक तयार होईल. कारखान्यात इथेनॉल आणि डिस्टिलरीचे उत्पन्नही घेण्यात येणार असून दररोज ८० ते १०० सिलेंडर ऑक्सिजनची निर्मिती करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी २०० टन ऊस उत्पादन घ्यावे यासाठी कारखान्याकडून सर्व सुविधा मोफत उपलब्ध करून दिल्या आहेत.
यावेळी कारखान्याचे संचालक अनिलराव यादव यांनी दत्त कारखान्याच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचा आढावा घेऊन दत्त उद्योग समूहाच्या वतीने चेअरमन, उद्यानपंडीत गणपतराव पाटील यांचा सत्कार केला. तसेच शेतकऱ्यांच्या वतीनेही सत्कार करण्यात आला. यावेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन श्रेणिक पाटील, सर्व संचालक मंडळ, कारखान्याचे कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील, सर्व विभागाचे खातेप्रमुख, पदाधिकारी, मान्यवर व शेतकरी उपस्थित होते.