प्रेस मीडिया वृत्तसेवा :
शिरोळ /प्रतिनिधी:
शिरोळ तालुक्यातील कृषी क्षेत्रांमधील शाश्वत विकासाकरिता जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकरी हिताचे निर्णय घेण्याकरिता सर्वपक्षीय नेतेमंडळींनी दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन उद्यानपंडित गणपतराव पाटील यांची उमेदवारी जाहीर केली आहे. तालुक्यात सोसायटी ठराव धारकांच्या भेटीगाठी घेत असताना शेतकरी आर्थिक दृष्ट्या समृद्ध होण्याकरिता गणपतराव पाटील हेच जिल्हा बँकेच्या संचालक मंडळात जाणे गरजेचे आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, असा विश्वास ठरावधारक आम्हाला देत आहेत. त्यामुळे या निवडणुकीत शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून गणपतराव पाटीलच विजय होतील असा विश्वास माजी आमदार उल्हासदादा पाटील यांनी प्रचार दौऱ्यादरम्यान ठराव धारकांच्या समोर बोलताना व्यक्त केला.
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूक निमित्ताने शिरोळ तालुक्यातील सोसायटी मतदार संघातून दत्त कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून त्यांच्या प्रचारार्थ सर्वपक्षीय नेतेमंडळींनी हरोली, नांदणी, जयसिंगपूर, उमळवाड, कोथळी, दानोळी, कवठेसार, तमदलगे, निमशिरगाव, चिपरी या गावातील ठरावधारकांच्या भेटी घेऊन गणपतराव पाटील यांनाच विजयी करण्याचे आवाहन केले. यावेळी प्रत्येक गावात गणपतराव पाटील आणि सर्वपक्षीय नेते मंडळींचे फटाके उडवून जल्लोषात स्वागत करण्यात आले.
माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले, गणपतराव पाटील यांनी आपल्या विविध संस्थेच्या माध्यमातून शेतकरी हिताचे निर्णय घेऊन शेतकऱ्यांना आर्थिक सक्षम करण्याचा प्रयत्न केला आहे. ते जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवून त्यांची प्रगती कशी होईल यासाठी प्रयत्नशील राहतील असा आमचा विश्वास असल्यामुळे त्यांना जिल्हा बँकेच्या निवडणुकीकरिता सर्वपक्षीय नेतेमंडळींनी उभे केले आहे. शिरोळ तालुक्यात परिवर्तनाची लाट निर्माण झाली असून तालुक्यातील १०० हून अधिक ठरावधारक गणपतराव पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याने तेच शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून संचालक मंडळात जातील. कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती महादेव धनवडे म्हणाले, शिरोळ तालुक्यातील सर्वसमावेशक चेहरा म्हणून गणपतराव पाटील यांच्या नेतृत्वा कडे पाहिले जाते. सर्वांचे प्रश्न सोडविण्याकरिता ते नेहमीच पुढाकार घेतात. शिरोळ तालुक्यातील कृषी क्षेत्रात क्रांती घडवण्याचा उपक्रम क्षारपड मुक्त जमीन हा प्रकल्प हाती घेऊन त्यांनी साडेतीन हजार हेक्टर नापीक जमीन पिकाऊ केली आहे. यामुळे शेतकरी सक्षम होत आहेत. शेतकऱ्यांचा प्रगती साधणारा नेता जिल्हा बँकेच्या संचालक मंडळात असणे आवश्यक आहे. गणपतराव पाटील यांचे कार्य आदर्शवत असल्याने तालुक्यातील ठरावधारक त्यांच्या पाठीशी उभे राहून शिरोळ तालुक्यात परिवर्तन घडवतील. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी चेअरमन विठ्ठलराव नाईक निंबाळकर म्हणाले, शिरोळ तालुक्यात सत्तेचे विकेंद्रीकरण झाले पाहिजे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण असणारा नेता जिल्हा बँकेच्या संचालक मंडळात असणे आवश्यक आहे. याकरिताच गणपतराव पाटील यांच्यासारखे सर्वसमावेशक नेतृत्व शेतकर्यांना हवे आहे. त्यामुळेच सर्वपक्षीय नेतेमंडळी त्यांच्या पाठीशी असून त्यांना विजयी करण्याकरिता जिवाचे रान करीत आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते अनिल उर्फ सावकर मादनाईक म्हणाले, जिल्हा बँक आणि नाबार्डच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवून त्यांची प्रगती साधण्याकरिता सर्वपक्षीय नेतेमंडळींनी गणपतराव पाटील यांची उमेदवारी जाहीर केली. माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सर्वजण गणपतराव पाटील यांच्या विजयासाठी प्रयत्न करीत आहेत. गणपतराव पाटील यांनी कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करताना सातत्याने शेतकरी हित जोपासण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचे फळ जिल्हा बँकेच्या निवडणुकीत त्यांना मिळणार असून सोसायटी ठरावधारक त्यांना आमचा प्रतिनिधी म्हणून जिल्हा बँकेच्या संचालक मंडळात पाठवतील असे त्यांनी सांगितले. दत्त साखर कारखान्याचे चेअरमन, जिल्हा बँकेचे उमेदवार गणपतराव पाटील बोलताना म्हणाले, सर्वपक्षीय नेतेमंडळींनी मला ही निवडणूक लढविण्याचा आग्रह केला. मीही काही ठराव धारकांच्या सोबत चर्चा केली. त्यांनीही शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याकरता निवडणूक लढवण्याचा आग्रह केल्याने जिल्हा बँकेची मी निवडणूक लढवणार आहे. कोणाशी माझी राजकीय इर्षा नाही, द्वेष नाही. तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न सुटावेत, क्षारपड मुक्त जमीन हा प्रकल्प राबवण्यासाठी जिल्हा बँक आणि नाबार्डच्या माध्यमातून प्रयत्न करणे, शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती साधण्याकरिता विविध योजना राबविणे याकरिता ही निवडणूक लढवीत आहे. शेतकऱ्यांचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी यानिमित्ताने मिळावी याकरिता शिरोळ तालुक्यातील सर्व ठरावधारकांनी मला विजय करून सेवा करण्याची संधी द्यावी असे आवाहन त्यांनी केले.
गोकुळ दूध संघाचे माजी चेअरमन दिलीपराव पाटील, जिल्हा परिषदेचे सदस्य डॉ. अशोकराव माने, भाजपाचे शिरोळ तालुका अध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर, दत्त साखर कारखान्याचे संचालक शेखर पाटील, काँग्रेसचे शिरोळ तालुका अध्यक्ष सर्जेराव शिंदे, शिवसेना शिरोळ तालुका प्रमुख वैभव उगळे, उद्योगपती अशोकराव कोळेकर, दिलीप पाटील कोथळीकर, जयसिंगपूरचे माजी नगराध्यक्ष सदाशिव पोपळकर, नगरसेवक संजय पाटील कोथळीकर, युनूस डांगे, रणजीत पाटील, उपसभापती राजगोंडा पाटील, माजी उपसभापती भैरू हंकारे, दत्त ऊस वाहतूक संघटनेचे अध्यक्ष धनाजी पाटील नरदेकर यांच्यासह सर्वपक्षीय नेतेमंडळी, पदाधिकारी यांनी गणपतराव पाटील यांच्या विजयासाठी सोसायटी ठराव धारकांनी पाठीशी राहावेत असे आवाहन केले.
गणपतराव पाटील यांच्या प्रचार दौऱ्याला सर्वत्रच उस्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने त्यांचे जल्लोषात स्वागत होत आहे. प्रत्येक ठराव धारक गणपतराव पाटील यांची भेट घेऊन आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असे आश्वासन देत असल्याचे चित्र सर्वत्र दिसत असल्याने जिल्हा बँकेच्या निवडणुकीत गणपतराव पाटील यांचा विजय निश्चित मानला जात आहे.