शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने तालुक्यातील कोनसावळे रस्त्यासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले

   सिमेंट रस्त्याच्या काँक्रीटीकरण प्रक्रियेला सुरूवात होणार ...सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता भोळे 



प्रेस मीडिया वृत्तसेवा :

रायगड जिल्हाप्रमुख प्रतिनिधी : सुनील पाटील:

शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने तालुक्यातील कोनसावळे रस्त्यासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे .या आंदोलनामुळे येत्या एक महिन्यात सिमेंट रस्त्याच्या काँक्रीटीकरण प्रक्रियेला सुरूवात होणार असल्याची आश्‍वासक माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता भोळे व त्यांच्या सहकार्‍यांनी दिली आहे. जनतेच्या हितासाठी सदैव कार्यतत्पर असणारा शेतकरी कामगार पक्षाने जनतेला ग्रासणार्‍या विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी कंबर कसली आहे

. रायगड जिल्ह्यात अन्य मुलभ्ाूत प्रश्‍नांसोबत निकृष्ट दर्जाचे रस्ते ही सर्वात मोठी समस्या जनतेला भेडसावत आहे. या समस्येपासून जनतेला मुक्त करण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाने आंदोलनाचे हत्यार उचलले असून जिथे समस्या तिथे या अस्त्राचा प्रयोग करण्यात येत आहे. 

महत्त्वाचे म्हणजे हा प्रयोग यशस्वी सिद्ध होत असून संबंधित आस्थापनेकडून कृतीशीलतेने भूमिका घेण्यात येत असल्याचे चित्र आहे.रसायनी औद्योगिक वसाहतीकडे जाण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार्‍या या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून गेल्या काळात 18 नागरिकांचे बळी गेले आहेत. कोन पोलीस चौकी ते नवकार या रस्त्यासाठी 4 कोटी 25 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. नवकार गोडाऊन ते नारपोली हा रस्ता सी. आर. पी. एफ. या फंडातून मंजूर करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

शेतकरी कामगार पक्षाच्या आंदोलनाचा इशारा दिल्याने लगेच सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम हाती घेतले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयात जात नेत्यांना आंदोलन न करण्याची विनवणी केली होती. पण करण्यात आलेली दुरूस्ती निकृष्ट दर्जाची असल्यामुळे खड्डे आणि धुळीचे साम्राज्य यामुळे दर्जाहीन रस्ता आणि या समस्येकडे दुर्लक्ष करणारे प्रशासन यांच्या विरोधात कोन फाटा येथे सकाळी अकरा वाजता आमदार बाळाराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

या खड्ड्यांवर थांबायचे नाही, ही रस्त्याची अर्धवट मलमपट्टी नको तर संपूर्ण आठ किलोमीटरचा रस्ता काँक्रीटीकरण व्हावे आणि संपूर्ण रस्त्यावरील खड्डे डांबरीकरण करुन भरून घ्यावे यासाठी शेकापने रास्ता रोको आंदोलन केले. येथे टोल होता तेव्हा रस्ता चांगला होता. मात्र टोल नाका बंद झाल्यावर रस्त्याची अवस्था खराब झाली असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

पनवेल तालुका पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र दौंडकर यांनी देखील आमदार बाळाराम पाटील यांना रस्ता रोको आंदोलन न करण्याची विनंती केली होती. प्रशासकीय अधिकार्‍यांच्या विनंतीला मान देत आमदार बाळाराम पाटील यांनी प्रतीकात्मक रास्तारोको आंदोलन केले.

या आंदोलनात आमदार बाळाराम पाटील यांच्यासमवेत शेतकरी कामगार पक्षाचे विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष काशिनाथ पाटील, रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य राजू गणा पाटील, पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे, पुरोगामी युवक संघटनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष देवा पाटील, कोन ग्रामपंचायतीच्या सरपंच अनुशा अशोक म्हात्रे,सदस्य दीपक म्हात्रे,पुरषोत्तम भोईर,नाना मोरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राम भोईर आदी मान्यवरांच्या सहकार्य करतेआदी मान्यवरांच्या सहा कार्यकर्ते आणि पदाधिकारी सहभागी झाले होते.

शेकापने एकदा विषय घेतलाच का तो पूर्ण करतेच. येत्या एक महिन्यात सिमेंट काँक्रिटीकरण प्रक्रियेला सुरुवात न झाल्यास शेकाप स्टाईलने रस्ता रोखून धरू. काम पूर्ण होईपर्यंत शेकाप पाठपूरावा करणार आहे.


प्रीतम म्हात्रे, विरोधी पक्षनेते,

पनवेल महानगरपालिका.

Post a Comment

Previous Post Next Post