प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :
पुणे : महानगरपालिकेत लाच प्रकरण नुकतेच उघडकीस आल्याने
एकच खळबळ उडाली आहे. दुसऱ्या विभागात बदली न करण्यासाठी ही लाच घेताना पुणे महापालिकेचा मुकादमाला आणि झाडूवाल्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले. याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांना न्यायालयाने दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.
लाच लुचपत विभागाच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, रवी हा विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालय येथे मुकादम म्हणून नोकरी करतो, तर हर्षल हा झाडू मारण्याचे काम करतो. यातील ३६ वर्षीय तक्रारदार हे कचरा मोटार बिगारी कामगार आहेत. तक्रारदार यांची नाइट ड्यूटी सुरू ठेवण्यासाठी व किटक विभागात बदली न करण्यासाठी मुकादम रवी लोंढे याने त्यांच्याकडे पंधरा हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती. त्यानंतर आरोपींनी तक्रारदार यांच्याकडे दहा हजार रुपयांची लाच मागितली होती.
याबाबत तक्रारदार यांनी एसीबीकडे तक्रार केली. या तक्रारीची पडताळणी करण्यात आली. त्यावेळी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार शनिवारी सापळा रचून कारवाई करण्यात आली.