प्रेस मीडिया वृत्तसेवा :
हडपसर : हडपसर इंडस्ट्रीजमध्ये कॅनालवरील वसाहतीवर पाटबंधारे विभागाने कारवाई केली़ या कारवाईत बेघर झालेल्यांचा संसार सध्या उघड्यावर पडला असून मुले, वृद्धांनी रात्र थंडीत कुडकुडत काढली. राहायला छत नाही़ खाण्याचे साहित्य कारवाईत गेल्याने मुलाबाळांवर उपासमारीची वेळ आली आहे. जवळपास दोनशे कुटुंबं सध्या उन्हातान्हात बसून आहेत.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे नवनिर्वाचित पुणे शहराध्यक्ष शैलेंद्र चव्हाण यांनी हडपसर इंडस्ट्रीज व शूटिंग रेंज जवळील कॅनालवरील कारवाई झालेल्या भागाची कार्यकर्त्यांसह पहाणी केली. यावेळी रिपाइं पुणे शहर युवक सरचिटणीस महादेव कांबळे, कामगार आघाडी शहर अध्यक्ष रामभाऊ कर्वे, सामाजिक कार्यकर्ते सुभाष सरवदे, दिपक ईसावे, सुखदेव कांबळे, अशिष आल्हाट आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
पाटबंधारे खाते व मनपा विभागाने पोलीसी बळाचा वापर करून नागरिकांच्या घरावर बुलडोझर फिरवला़ हा प्रकार अतिशय निंदनीय आहे़ येथील जनतेला उघड्यावर सोडले. त्यांना अन्न, वस्त्र, निवारा मिळाला पाहिजे़ आम्ही याचा निषेध करतो़ मनपा, पाटबंधारे विभागाने या गोरगरीब नागरिकांचे पुनर्वसन करावे़
- शैलेंद्र चव्हाण, रिपाइं, शहराध्यक्ष