प्रेस मीडिया वृत्तसेवा :
पुणे: रशियातील पहिल्या पावसाच्या सरींसोबत गणारायाचं आगमन, आरती, मिरवणूक, अस्सल माराठमोळे शिवकालीन पारंपरीक पोशाख असा दिमाखदार महाराष्ट्रीयन संस्कृतीचा जागर सोहळा नुकताच मॉस्को शहरात पार पडला. रशियन संस्कृती आणि महाराष्ट्रीयन संस्कृतीचा अनोखा मिलाफ यावेळी पाहायला मिळाला. 'रॉयल तष्ट'च्या वतीने या संस्कृतीची आदान प्रदान करणाऱ्या अनोख्या सोहळ्याचे सादरीकरण करण्यात आले. रशियातील 'एक्झिटो' या मीडिया कंपनीने 'तष्ट' ला आपली कला सादर करण्यास आमंत्रित केले होते.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर 'रॉयल तष्ट'च्या वतीने आपली संस्कृती, कला याचे सादरीकरण रशियाची राजधानी मॉस्को शहरात करण्यात आले. यावेळी 22 जणांच्या टीम सोबत 'रॉयल तष्ट'चे संचालक दीपक माने, क्रिएटिव्ह हेड रवींद्र पवार, शो कॉर्डिनेटर अभिनंदन देशमुख आदी सहभागी झाले होते.
या दौऱ्यातील अनुभवा बद्दल बोलताना 'रॉयल तष्ट'चे क्रिएटिव्ह हेड रवींद्र पवार म्हणाले, या दौऱ्यातील अनुभव आमच्यासाठी अविस्मरणीय आहे. आपली संस्कृती त्यांना समजावून सांगताना आम्हाला खूप अभिमान वाटला. रशियातील लोकांना मराठी किंवा इंग्रजी कळत नाही. पण त्यांना आपल्या ऐतिहासिक वास्तू आणि संस्कृती बद्दल खूप आकर्षण आहे. पहिल्या दिवशी आम्ही गणेशोत्सवावरील नृत्य सादरीकरण केले. त्यात अनेक रशियन नागरिक स्वतःहून सहभागी झाले. मराठी गाणी त्यांना खूप आवडली. गणपती आरातीची जणू त्यांना भूरळच पडली. त्यांनी या आरतिचा अर्थ आमच्याकडून भाषांतरीत करून घेतला आणि म्हणण्याचा देखील प्रयत्न केला. अल्बट स्ट्रीटयेथे गणेशोत्सव सादर केला. यामध्ये आरती, मिरवणूक आम्ही सादर केली. तर दुसऱ्या दिवशी मॉस्को शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी 'शिवजातस्य' हे शिवाजी महाराजांचे कलेक्शन व इतर काही नवीन कलेक्शन सादर केले. आगामी काळात एक्झिटो' या मीडिया कंपनीने दुबईत कला सादर करण्याचे निमंत्रण दिल्याचेही पवार यांनी सांगितले.