प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सह शहर अभियंता श्रीकांत सवणे १२ वर्षांपासून बीआरटी विभागात ठाण मांडून आहेत. ठेकेदाराला अरेरावी करतात. सल्लागाराची बिले रोखतात. भाजपला ‘इलेक्शन फंड’ गोळा करून देण्यासाठी कोटी कोटी रुपयांची कामे काढली जात आहेत का...? १२ वर्षे झाली तरी सवणे यांची बदली का होत नाही? असा सवाल नगरसेवकांनी महासभेत केला.
पिंपरी-चिंचवड महापालिकेची ऑक्टोबर महिन्याची सर्वसाधारण सभा बुधवारी पार पडली. बीआरटी विभागाचे सह शहर अभियंता श्रीकांत सवणे यांच्या कार्यपद्धतीवर नगरसेवकांनी विविध आक्षेप घेतले. भाजपचे माऊली थोरात म्हणाले, “कासारवाडी उड्डाणपुलाचा रॅम्प चुकीच्या पद्धतीने बांधण्यात आला. गेल्या १२ वर्षांपासून धूळखात पडून आहे. त्याचा वापर होत नाही. त्याची दोषी अधिकाऱ्यावर जबाबदारी निश्चित करण्याऐवजी अधिकाऱ्याला बढतीचे बक्षीस दिले. हा कुठला आणि कसला कारभार आहे असा सवाल करत त्यांनी सवणे यांच्या बढती वर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
शिवसेना गटनेते राहुल कलाटे म्हणाले, “श्रीकांत सवणे १२ वर्षांपासून बीआरटी विभागात ठाण मांडून आहेत. त्यांची बदली का होत नाही. औध-रावेत रस्त्याच्या डागडुजीच्या कामाची स्मार्ट सिटीतून १०० कोटींची निविदा काढण्याचा प्रयत्न केला. पण, त्याला विरोध केल्यावर ते थांबले. आता बीआरटी विभागातून ६०कोटी रुपयांची निविदा काढली आहे. भाजपला ‘इलेक्शन फंड’ गोळा करून देण्यासाठी कोटी कोटी रुपयांची कामे काढली जात आहेत का? सवणे ठेकेदाराला अरेरावी करतात. सल्लागाराची बिले रोखली जातात. राजकीय लोक खुर्च्यासाठी भांडतात हे माहिती होते. पण, अधिकारीही खुर्चीसाठी भांडतात हे पाहिले. स्थायी समितीच्या सभेत सवणे हे खुर्चीसाठी भांडत होते”, असेही कलाटे म्हणाले.
*जाहिरात व बातम्यांसाठी संपर्क 9975071717*