प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :
राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकारने याबाबत नियुक्तीचा आदेश जारी केला आहे. रूपाली चाकणकर आज ,गुरुवारी अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारणार आहेत.
राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून महिला आयोगाचं अध्यक्षपद रिक्त होतं. अखेर या पदावर रुपाली चाकणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रुपाली चाकणकर आपल्या आक्रमक भाषणशैलीने ओळखल्या जातात. चित्रा वाघ यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर रुपाली चाकणकर यांना राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली आहे.
भाजप आणि शिवसेना सरकारच्या काळात विजया रहाटकर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी होत्या. त्यानंतर सत्तेत आलेल्या महाविकास आघाडी सरकारने महामंडळ आणि विविध शासकीय पदावरील नियुक्त्या रद्द केल्या. त्याचबरोबर महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचं पदही रिक्त झालं होतं.