प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :
पिंपळे सौदागर येथे इलेक्ट्रिक डीपी मध्ये स्फोट होऊन आग लागली. यामध्ये आजूबाजूचे गवत, कचरा तसेच एक नारळाचे झाड जळाले आहे. ही घटना आज रविवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास रोजलँड सोसायटी येथे घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, पिंपळे सौदागर येथील रोजलँड सोसायटीच्या बाजूला महावितरणचा इलेक्ट्रिक डीपी आहे. डीपीमध्ये सायंकाळी शॉर्टसर्किट होऊन स्फोट झाला. यामुळे लागलेल्या आगीत डीपीच्या आजूबाजूचे गवत आणि एका नारळाच्या झाडाला आग लागली. सोसायटीतील नागरिकांनी प्रसंगावधान राखून सोसायटीतील आग रोधक सिलेंडरचा वापर करून आग विझविण्याचा प्रयत्न केला.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाचा एक बंब घटनास्थळी दाखल झाला. काही वेळेत आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. या घटनेमुळे सोसायटीतील वीजपुरवठा खंडित झाला आहे. दरम्यान रविवारी रात्री भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना असल्याने ऐन मोक्यावर बत्ती गुल झाल्याने अनेक क्रिकेटप्रेमींचा हिरमोड झाला आहे.