प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने ‘स्वच्छाग्रह_स्वच्छतेकडून_समृद्धीकडे..’, ‘आपल्या प्रत्येकाची जबाबदारी, स्वच्छतेची घेऊया खबरदारी’, ‘चला निश्चय करूया, पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छ आणि सुंदर बनवुया’ अशा घोषवाक्याने ३९ व्या वर्धापन दिन व स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षात स्वच्छ व सुंदर कचरा मुक्त शहर करण्याचा आरोग्यासोबत पर्यावरण विषयी महत्वपुर्ण संकल्प केला.
पिंपरी-चिंचवड शहरातील कचरा विलगीकरण, ओला आणि सुका कचरा वेगळा करुन देण्याबाबत घरोघरी जनजागृती करण्यासाठी महापालिकेने आठ संस्थाची नियुक्ती केली आहे. एक वर्षासाठी या संस्थांची नियुक्ती केली. एका घरी जनजागृती करण्यासाठी संस्थेला २३ रुपये दिले जाणार आहेत. त्यासाठी येणा-या १९ कोटी २० लाख ७५ हजार रुपयांच्या आयुक्तांनी मांडलेल्या आयत्यावेळच्या प्रस्तावाला स्थायी समितीने बिनभोबाट मान्यता दिली आहे.
या महत्त्वपूर्ण संकल्पासोबतच स्वच्छाग्रह या स्वच्छता अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. महापालिकेकडून दररोज कचरा संकलन करुन मोशी डेपोत नेला जातो. शहरात दिवसाला १२०० टन कचरा गोळा होतो. नागरिक ओला आणि सुका कचरा वेगळा देत नाहीत. त्यामुळे ओल्या कच-याचे खत तयार करता येत नसल्याचे महापालिकेचा दावा आहे. त्यासाठी नागरिकांनी ओला आणि सुका कचरा वेगळा करुन देण्याबाबत जनजागृती केली जाणार आहे.
यासाठी महापालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयानिहाय संस्थांची नियुक्ती केली आहे. ‘अ’ प्रभाग कार्यालय हद्दीतीतील कचरा अलगीकरण जनजागृतीसाठी बेसिक्स म्युनिसिपल बेस्ट व्हेचर्स यांची नियुक्ती केली. एका घरी जनजागृतीसाठी २३ रुपये दिले जाणार आहेत. प्रभागात ८९ हजार ८ घरे, आस्थापना आहेत. त्यांना एकूण २ कोटी ४५ लाख ६६ हजार २०८ रुपये दिले जाणार आहे.