प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पोलिसांसाठी वाहने आणि इतर साहित्य देण्याचा प्रस्ताव महापालिकेकडे सादर केला होता. त्यावर कार्यवाही झाली असून महापालिका पोलिसांच्या गस्तीसाठी ५० ई-बाईक खरेदी करण्याचा प्रस्ताव महापालिका स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला आहे.
शहरात पोलीस गस्त वाढल्याने पोलिसांचा वावर वाढेल, त्याचा गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी फायदा होईल. मात्र गस्तीसाठी पोलिसांकडे मोजकी वाहने आहेत.
११ ऑगस्ट २०२१ रोजी पोलीस आयुक्तांनी महापालिकेकडे स्मार्ट बाईक्स, दोन माईक, सायरन, ब्लिंकर / फ्लॅश लाईट, कॅमेरा, जीपीएस ट्रेकिंग सिस्टम, जॅमर होल्डर, हेल्मेट विथ हेल्मेट होल्डर आदी साधनांची मागणी केली होती. त्यानुसार ९४ हजार ८५० रुपये दराने ७४ लाख ४२ हजार ४०० रुपयांमध्ये ५० ई बाईक खरेदी करणार असल्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.
कोरोना काळात महापालिका आणि पोलिसांच्या संयुक्त मोहिमेतून मास्क न वापरणा-या, विनापरवाना अनावश्यक फिरणा-या नागरिकांकडून दोन कोटी ३४ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. त्या दंडाच्या रकमेतून ५० ई बाईक खरेदी करण्याचा महापालिकेचा मानस आहे.
पिंपरी-चिंचवड शहराची वाढलेली लोकसंख्या, झपाट्याने होणारा विकास यामुळे शहरात गर्दी, वाहतूक नियमन, नियंत्रण आणि गुन्हेगारी घटनांना आळा घालण्यासाठी १५ ऑगस्ट २०१८ रोजी शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय कार्यान्वित झाले. पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीसह हिंजवडी, चाकण, तळेगाव, देहूरोड, आळंदी हा भाग देखील पोलीस आयुक्तालयात समाविष्ट करण्यात आला.
गुन्हेगारीवर वचक ठेवण्यासाठी पोलीस पेट्रोलिंगची आवश्यकता आहे. त्यासाठी मोटारसायकल हे प्रभावी साधन आहे. मोटारसायकलने कर्मचारी कमीत कमी वेळेत अरुंद गल्ली, झोपडपट्टी अशा ठिकाणी सुद्धा पोहोचतात.