प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :
बँकेच्या अॅप्लिकेशनमध्ये तांत्रिक अडचण येत असल्याने इंटरनेट वरून मिळवलेल्या हेल्पलाईनवर संपर्क केला असता अज्ञात व्यक्तीने अॅप्लिकेशन डाउनलोड करण्यास सांगितले. त्यानंतर व्यक्तीच्या खात्यातून सव्वादोन लाख रुपये काढून फसवणूक केली. ही घटना मंगळवारी (दि. 28) सकाळी चिंचवड गाव येथे घडली.
रविराज सतीश कर्णे (वय 32, रा. चिंचवडगाव, पुणे) यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे एसबीआय बँकेचे योनो अॅप्लिकेशन चालत नव्हते. त्यामुळे त्यांनी ऑनलाईन कस्टमर केअर नंबर शोधला. त्यांना 9339601192 हा क्रमांक मिळाला. त्यांनी त्यावर फोन केला असता अज्ञात व्यक्तीने फिर्यादी यांना anydes app हे अॅप्लिकेशन डाउनलोड करण्यास सांगितले.
फिर्यादी यांनी त्याच दिवशी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास त्यांच्या बँकेतील बॅलन्स तपासला असता बँक खात्यात केवळ दहा रुपये शिल्लक असल्याचे निदर्शनास आले. बँकेत चौकशी केली असता त्यांना समजले कि, त्यांच्या सेविंग अकाउंटवरील व फिक्स डिपॉझिट वरील लोन केलेले पैसे 31662960569 व 32962463275 या खात्यांवर ट्रान्स्फर झाले आहेत. तसेच एटीएम मधून देखील 20 हजार रुपये काढण्यात आले. एकूण दोन लाख 27 हजार 550 रुपये फिर्यादी यांच्या बँक खात्यातून काढून घेत अज्ञाताने फिर्यादी यांची फसवणूक केली आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.