प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :
पिंपरी-चिंचवड शहरातील ८ वी ते १२ वीचे वर्ग सुरु होणार आहेत. विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्यापूर्वी त्यांच्या पालकांची लेखी सहमती शाळा प्रमुखांनी घेणे आवश्यक असून याबाबतचे आदेश आयुक्त राजेश पाटील यांनी काढले आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने शहरी भागातील शाळा सुरु करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे.
त्याचबरोबर सर्व शिक्षकांचे लसीकरण होणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या पालकांचे संमतीपत्र भरुन घेणे आवश्यक आहे. शाळा सुरु करण्यापूर्वी शाळा निर्जंतुकीकरण, तापमान मोजणीसाठीची गण, डिजिटल थर्मामीटर, हात धुण्याची व्यवस्था, सुरक्षित अंतराचे पालन करणे आवश्यक आहे.
शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचा-यांची कोरोनाची टेस्ट निगेटीव्ह असली पाहिजे. कोणत्याही प्रकारची लक्षणे नसलेल्या कर्मचा-यांनाच कामावर हजर करुन घ्यावे. प्रत्यक्ष शाळा सुरु करण्याकरिता शाळेतील १००% टक्के शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचा-यांची कोरोना टेस्ट करणे बंधनकारक आहे.
विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्यापूर्वी त्यांच्या पालकांची लेखी सहमती शाळा प्रमुखांनी प्राप्त करुन घ्यावी. शाळेचा परिसर स्वच्छ ठेवावा, स्वच्छतागृहांचे वारंवार निर्जंतुकीकरण करावे. शाळा वाहतुकीच्या वाहनांचे दिवसातून किमान दोनवेळा निर्जंतुकीकरण केले जाते का याची खातरजमा शाळा व्यवस्थापनाने करावी असे आदेश देण्यात आले आहेत.