प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :
केंद्र सरकारने महत्त्वाकांक्षी स्मार्ट सिटी योजनेला मार्च २०२३पर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवडसह देशातील १०० स्मार्ट सिटींना दिलासा मिळाला आहे. या मुदतवाढीमुळे रखडलेल्या योजना मार्गी लागण्यासह प्रस्तावित योजना राबविण्यासंदर्भातील अडचणीही दूर होणार आहेत. दीड वर्षात कामे पूर्ण करण्याचे स्मार्ट सिटी समोर आव्हान उभे राहिले आहे.
राज्य सरकारकडून ९८ कोटीचा निधी मंजूर झाला असून तो मिळाल्यानंतर एकूण ७८० कोटी रुपयांचा निधी स्मार्ट सिटीला मिळणार आहे. त्यापैकी ५६४ कोटी रुपयांचा निधी विकासकामांवार खर्च झाला आहे. पण, मागील पाच वर्षात एकही प्रकल्प पूर्णात्वाकडे गेला नाही. ५०% टक्के काम पूर्ण झाले आहे. आता स्मार्ट सिटीला दीड वर्षाची मुदतवाढ मिळाली आहे. या दीड वर्षाच्या मुदतीत अर्धवट कामे पूर्ण करण्याचे आव्हान स्मार्ट सिटी समोर असणार आहे.
पिंपरी-चिंचवड शहराचा स्मार्ट सिटीत तिस-या टप्प्यात समावेश झाला. ३० डिसेंबर २०१६ रोजी शहराची स्मार्ट सिटीत निवड झाली. पाच वर्षात स्मार्ट सिटीतील एकही प्रकल्प पूर्ण झाला नाही. ६०० किलो मीटरपैकी ५०५ किलो मीटरची खोदाई झाली. १ हजार कोटी रुपयांचा प्रकल्प असून आत्तापर्यंत ६८५ कोटी निधी मिळाला आहे.
स्मार्ट सिटी योजनेमध्ये देशातील १०० तर महाराष्ट्रातील आठ शहरांचा समावेश आहे. या योजनेत पिंपरी-चिंचवड हे देशात रसातळाला आहे. या आधीच्या धोरणानुसार ‘स्मार्ट सिटी’ कामांच्या पूर्णत्वासाठी मार्च २०२१ पर्यंत मुदत देण्यात आली होती.संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘व्हीसी द्वारे बैठक घेऊन सर्व शहरांना या योजनांची कामे मार्च २०२२ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते.