ममदापूर ग्रामपंचायत मध्ये अधिकारी व सरपंच, सदस्य यांसकडून ४३०५०० रूपयांचा भ्रष्टाचार...
प्रेस मीडिया वृत्तसेवा :
पनवेल सुनील पाटील
कर्जत तालुक्यातील विस्ताराने आणि आर्थिक उत्पन्नाने तिसऱ्या स्थानावर असणाऱ्या नेरळ संकुल विकास प्राधिकरण क्षेत्रातील ममदापूर ग्रामपंचायतीत दलितवस्ती १५% अनुदान खर्च वितरण गैरव्यवहार झाल्याची तक्रार माहिती अधिकारातील सामाजिक कार्यकर्ते सचिन अभंगे यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत रायगड जिल्हा परिषद अलिबाग व गट विकास अधिकारी पंचायत समिती कर्जत यांच्याकडे अनुक्रमे १६ जुलै व २० जुलै २०२१ रोजी केली होती. ममदापूरसह संपूर्ण तालुक्यात जगजाहीर झालेल्या गैरव्यवहाराची रितसर चौकशी होऊन अहवाल सादर करण्याबाबत उपमुख्य कार्यकारी अधिकारी शितल पुंड यांनी ५ ऑगस्ट रोजी पंचायत समिती कर्जत गट विकास अधिकारी यांना आदेश दिले. त्यानुषंगाने २० ऑगस्ट च्या गट विकास अधिकारी बालाजी पुरी यांच्या पत्रान्वये २७ ऑगस्ट रोजी विस्तार अधिकारी ग्रामपंचायत उज्वला भोसले यांच्यामार्फत सदर गैरव्यवहार संदर्भात ममदापूर ग्रामपंचायत कार्यालय येथे चौकशी संपन्न झाली. सदर चौकशीत २१ प्रकारची स्वयंपाकी व जेवणावळी साहित्य, २०० खुर्च्या, ५० केटरिंग टेबल खरेदी बाबत आवश्यक असणारे कोटेशन, खरेदी केलेले जीएस सीएसटी बिल, दुकानदाराने दिलेल्या पावत्या, डेडस्टाॅक रजिस्टर, साठा नोंद वही, वस्तूंची पोहोच आणि वाटप या सर्व बाबी कागदोपत्री अनियमित असताना देखील विस्तार अधिकारी उज्वला भोसले यांनी ग्रामपंचायत दप्तर योग्य असल्याचे नमूद केले आहे. कागदावर वस्तू खरेदी केल्याचे दर्शविले असून प्रत्यक्षात मात्र किती आणि कोणत्या वस्तू खरेदी केलेल्या आहेत याची पाहानी न करता सदर वस्तू खरेदी झाल्याचे विस्तार अधिकारी यांनी नमूद केलेले आहे. ममदापूर ग्रामपंचायतीने सदर वस्तू दलित वस्तीतील ज्या सभागृहात ठेवलेल्या आहेत तेथे जाऊन खरोखरच २१ प्रकारच्या वस्तू मोजून पाहिल्या का ? हा प्रश्न आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. ममदापूर ग्रामपंचायतीने काही मर्जीतील नागरिकांच्या सह्या घेऊन काही बोगस मंडळांना ताबा दिल्याचे म्हटले आहे. परंतु, प्रत्यक्षात मात्र अशी कोणतीही मंडळे अधिकृत नोंदणीकृत नाहीत.
तक्रारदार यांच्या घरासमोरच सभागृह असून सन १९९०-९१ या आर्थिक वर्षात हे समाज मंदिर बांधले असून १९९४ पासून ममदापूर ग्रामपंचायत अस्तित्वात आल्यापासून या वास्तूत ग्रामपंचायतीने दिलेल्या लाभाच्या असंख्य वस्तूंचा ढीग पडलेला आहे. गेल्या ३० वर्षे पुरातन वास्तूत अपुऱ्या जागेत इतके २१ प्रकारचे जेवणावळी साहित्य ठेवणे शक्यच नाही असे असतानाही विस्तार अधिकारी यांना कोणते साहित्य दिसले? आणि तक्रारदाराला दिसले नाही असा सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे.
दरम्यान, गेली सहा महिने तक्रारदार सचिन अभंगे यांचा या गैरव्यवहारातील सत्य बाहेर काढण्यासाठी सातत्याने पाठपुरावा चालू असताना ममदापूर ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामविकास अधिकारी आणि इतर सदस्य यांच्या संगनमताने घडून आलेल्या भ्रष्टाचाराबाबत ग्रामविकास अधिकारी व सरपंच यांना वाचविण्याचा प्रयत्न चौकशीच्या माध्यमातून श्रीमती उज्वला भोसले यांनी आणि त्या अहवालाची पूर्तता गट विकास अधिकारी(उश्रे) बालाजी पुरी यांनी केलेला आहे. दरम्यान, सदरचा अहवाल दिनांक २८।०९।२०२१ रोजी रायगड जिल्हा परिषद अलिबाग येथे विस्तार अधिकारी श्रीमती उज्वला भोसले यांनी सादर केला आहे. ममदापूर ग्रामपंचायत विकायला काढणा-या ग्रामविकास अधिकारी संजय राठोड यांनी पंचायत समिती कर्जत प्रशासन विकत घेतले आहे की काय? अशी संतप्त भावना नागरिकांनी व्यक्त केलेली आहे.
ममदापूर ग्रामपंचायतीने ४३०५००/- रूपयांच्या कागदोपत्री खरेदी केलेल्या वस्तू परंतु, अस्तित्वात नसताना देखील विस्तार अधिकारी श्रीमती उज्वला भोसले यांना सभागृहात दिसल्या हे जगातले दहावे आश्चर्य असून भ्रष्ट ग्रामविकास अधिकारी यांच्या पाठीशी कर्जत पंचायत समिती प्रशासन उभे असल्याचे द्योतक आहे. या चुकीच्या अहवालाच्या विरोधात राजिप अलिबाग मुख्य कार्यकारी अधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी(ग्रापं) यांच्याकडे न्याय मागणार असून बहिस्थ जिल्हास्तरीय समिती यांच्या मार्फत चौकशी केली जावी ही मागणी केली जाणार आहे. या अहवालाच्या माध्यमातून मानवी हस्तक्षेप असणाऱ्या सदरच्या चौकशीबाबत कर्जत पंचायत समिती प्रशासनाचा नागरिकांच्या वतीने आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो.