मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शन करणार...
प्रेस मीडिया वृत्तसेवा :
मुंबई : महाराष्ट्रासह अवघ्या देशाला नवी ऊर्जा, नवी प्रेरणा आणि नवी दिशा देणारा शिवसेनेचा ऐतिहासिक दसरा मेळावा आज शुक्रवारी सायंकाळी साडेसहा वाजता षण्मुखानंद सभागृहात होणार आहे.शिवसेनेचा दसरा मेळावा म्हणजे महाराष्ट्राचे सांस्कृतिक प्रतीकच बनला आहे. केवळ राज्याच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणाला याच मेळाव्यातून एक नवा विचार मिळतो, दिशा मिळते. शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शन करणार असून त्यांचा आसुड कोणावर कडाडणार याकडे प्रसारमाध्यमांसह देशाचे लक्ष लागले आहे.
शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यासाठी राज्याच्याच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱयातून शिवसैनिक लाखोंच्या संख्येने दाखल होतात. शिस्तीने, गुलाल उधळत शिवसैनिकांचे, शिवसेनाप्रेमींचे जथे वाजतगाजत शिवतीर्थावर पोहोचतात. परंतु कोरोना संकटामुळे गेल्या वर्षीपासून त्यावर थोडी मर्यादा आली आहे. गतवर्षीही दसरा मेळावा शिवतीर्थाऐवजी स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात घेतला गेला होता.
कोरोनाची एक लाट संपली. दुसरी लाटही ओसरली. कोरोना आता नियंत्रणात आहे, परंतु संकट पूर्णपणे संपलेले नाही. प्रत्येकाला स्वतःच्या, कुटुंबीयांच्या आणि समाजाच्या सुरक्षेसाठी कोरोना नियमावलीची शिस्त पाळावीच लागणार आहे. त्यामुळे या वर्षीचा दसरा मेळावा षण्मुखानंद सभागृहात मर्यादित उपस्थितीत घेतला जाणार आहे. कोरोना नियमावलीच्या शिस्तीचे पालन करून 50 टक्के शिवसैनिकांचीच उपस्थिती या मेळाव्याला असणार आहे. बंद सभागृहात मेळावा होत असला तरी शिवसैनिकांमधील जोश आणि उत्साह कायम आहे. उद्याच्या मेळाव्यासाठी षण्मुखानंदचा परिसर आतापासूनच स्वागताच्या कमानी, फलक यांनी सजला आहे.
सोशल मीडियावरून थेट प्रक्षेपण
षण्मुखानंद सभागृहात सायंकाळी 6.30 वाजता दसरा मेळाव्याला सुरुवात होईल. कोरोना नियमावलीचे त्यात काटेकोर पालन केले जाणार आहे. सभागृहात फक्त 50 टक्के उपस्थिती असेल. शिवसेना नेते, युवा सेनाप्रमुख आणि राज्याचे पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे प्रमुख नेते, उपनेते, खासदार, आमदार आणि संपर्कप्रमुख असे मोजके पदाधिकारीच सभागृहात असणार आहेत. वृत्तवाहिन्या आणि फेसबुकसारख्या सोशल मीडियावरून त्या भाषणाचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून देण्यात आली.
कोणावर आसुड ओढणार…सर्वांचे लक्ष
शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तोफ उद्या धडाडेल. पण ते कोणत्या विषयांवर, कोणावर आसुड ओढणार याविषयी प्रसारमाध्यमांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. दिल्लीच्या सीमेवर गेल्या दीड वर्षापासून शेतकऱयांचे आंदोलन सुरू आहे, पण त्यांची साधी विचारपूस करायलाही कुणी भाजपचा केंद्रीय मंत्री गेलेला नाही. केंद्रीय मंत्रिपुत्राने तर उत्तर प्रदेशच्या लखीमपूरमध्ये चार शेतकऱयांना गाडीखाली चिरडले. त्यावरही केंद्रातील भाजप सरकार मौन बाळगून आहे. जेथे भाजप सत्तेत नाही त्या राज्यांमध्ये ईडी, सीबीआय यासारख्या केंद्रीय तपास यंत्रणांचे धाडसत्र सुरू आहे. यावरून जोरदार राजकीय आरोप-प्रत्यारोप होत आहेत. एवढेच कशाला, भाजपकडून तर आता स्वातंत्र्यवीर सावरकर यांचीही बदनामी केली जात आहे. पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या सर्वांवर आपल्या खास 'ठाकरी' शैलीत आसुड ओढतील, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
स्थळ -षण्मुखानंद सभागृह
वेळ -सायं. 6.30 वाजता