दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :
क्रूझ ड्रग्ज पार्टीप्रकरणी आर्थर रोड तुरुंगात असलेल्या आर्यन खानच्या जामीन अर्जावर आता बुधवारी सुनावणी होणार आहे. त्यामुळे आर्यनचा आर्थर रोड तुरुंगातील मुक्काम वाढला आहे.नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) कॉड्रिला क्रूझवर कारवाई केली होती. पार्टीप्रकरणी सुरुवातीला एनसीबीने आर्यन खानसह चौघांना अटक केली होती. त्या चौघांना किल्ला कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावत त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता. त्यानंतर आर्यनच्या वकिलांनी जामिनासाठी सत्र न्यायालयात धाव घेतली होती. आज आर्यनसोबत अरबाज मर्चंट, मुनमुन धमेचा, नूपुर सतीजा, मोहक जयस्वालच्या जामिनासाठी अर्ज दाखल केले. काहींच्या जामीन अर्जाची प्रत कालच मिळाल्याने त्या सर्व जामीन अर्जांवर उत्तर देण्यासाठी एका आठवडय़ाची मुदत देण्यात यावी, एनसीबीचा तपास अद्याप बाकी असल्याचे विशेष सरकारी वकील अद्वैत सेठना यांनी न्यायालयात सांगितले. जर आर्यनला जामीन दिल्यास त्याचा तपासावर परिणाम होऊ शकतो असे एनसीबीच्या वतीने न्यायालयात सांगण्यात आले. तसेच आरोपीच्या जामीन अर्जावर तत्काळ सुनावणी घेण्याइतकी गरज नसल्याचे सेठना यांनी न्यायालयात सांगितले. बुधवारी दुपारी आर्यनच्या जामिनासाठी सुनावणी होईल.
सहा जणांना न्यायालयीन कोठडी
क्रूझ पार्टीप्रकरणी एनसीबीने अटक केलेल्या अब्दुल शेख , श्रेयस नायर , मनीष राजगडिया , अविन साहू आणि इतर दोघांच्या एनसीबी कोठडीची मुदत संपत असल्याने त्या सर्वांना आज किल्ला कोर्टात हजर करण्यात आले . त्या सहा जणांना न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे