बाहेर उद्या संध्याकाळ पर्यंत किंवा शनिवारी येतील.....आर्यन खानचे वकील मुकूल रोहतगी यांनी माहिती दिलीय.
प्रेस मीडिया वृत्तसेवा : सुनिल पाटील :
मुंबई : मुंबई क्रूझ ड्रग्स प्रकरणात अखेर शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला जामीन मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयात जवळपास तीन दिवस दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर हा निर्णय देण्यात आलाय.उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा या तिघांनाही जामीन मंजूर करण्यात आला आहे. दरम्यान, आज जामीन मंजूर करण्यात आला असला तरी हे तिघेही आज कारागृहाबाहेर पडण्याची शक्यता कमी आहे. त्याबाबत आर्यन खानचे वकील मुकूल रोहतगी यांनी माहिती दिलीय.
आर्यन खान कारागृहाबाहेर कधी येणार..?
मुंबई उच्च न्यायालयाने तिनही आरोपींना जामीन दिला आहे. आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. माननीय उच्च न्यायालयाने जवळपास तीन दिवस दोन्ही बाजू ऐकून घेतल्या. उच्च न्यायालयाच्या आदेशाची प्रत उद्या मिळेल आणि मला आशा आहे की हे तिघेही उद्या संध्याकाळपर्यंत किंवा शनिवारी बाहेर येतील, अशी माहिती आर्यन खानचे वकील मुकूल रोहतगी यांनी दिली आहे.
मुनमुन धमेचा यांच्या वकिलांनी काय माहिती दिली..?
न्यायमूर्तींनी प्रकरण ऐकून आम्हाला जामीन दिला आहे, असं वकीलांकडून सांगण्यात आलं आहे. कोर्टानं आर्यन खान, मुनमुन धामेचा आणि अरबाज खानला जामीन दिला आहे. आज हायकोर्टानं युक्तिवाद ऐकून तिघांना जामीन दिला आहे. उद्या कोर्टाची सविस्तर ऑर्डर मिळेल, असं वकिलांनी सांगितलं आहे. न्यायमूर्ती नितीन सांबरे यांच्या खंडपीठासमोर तीन दिवस जामीनासाठी सुनावणी झाली. एनसीबीनं सेशन कोर्टात केलेला युक्तिवाद पुन्हा मुंबई हायकोर्टात केल्याचा दावा मुनमुन धामेचा यांच्या वकिलानं सांगितलं आहे, असं मुनमुन धमेचाचे वकील म्हणाले.
आरोपींना कोणत्या अटींवर जामीन..?
साक्षीदार फोडू नये, तपासात अडथळा आणू नये, परवानगी शिवाय शहराबाहेर जाऊ नये, प्रत्येक शुक्रवारी कोर्टात हजर राहावे आदी शर्तीवर त्यांना जामीन देण्यात आला आहे, असं वकिलांनी सांगितलं. मात्र, जामिनाची रक्कम अजून कळली नसल्याचं त्यांनी सांगितलं.
जामीनाला एनसीबीचा तीव्र विरोध
एनसीबीची केस अशी आहे की, आर्यनने एकप्रकारे जाणीवपूर्वक अमलीपदार्थ बाळगले होते. त्याचे अमलीपदार्थ विक्रेत्यांशी संबंध आहेत आणि अटकही वैध आहे. तो कटाचा एक भाग आहे. त्यामुळे त्याचा जामीन अर्ज फेटाळावा अशी मागणी एनसीबीचे वकील अनिल सिंग यांनी केलीय. एनसीबीचा तपास अजून सुरु आहे. आरोपींना जामिनावर सोडलं तर ते साक्षी पुराव्यांविषयी छेडछाड करु शकतात, असा युक्तिवाद एनसीबीचे वकील अनिल सिंग यांच्याकडून करण्यात आला होता.