प्रेस मीडिया वृत्तसेवा :
तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत नट्टू काकांची भूमिका रंगवणारे लोकप्रिय अभिनेते घनश्याम नायक यांचे निधन झाले आहे. वयाच्या 78 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली.घनश्याम नायक यांना कर्करोग झाल्याचे गेल्या वर्षी स्पष्ट झाले होते. त्यानंतर त्यांच्यावर उपचारही सुरू झाले होते, मात्र कर्करोगाशी सुरु असलेली त्यांची झुंज अपयशी ठरली असून रविवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी यांनी नट्टू काका यांच्या निधनाची माहिती दिली. त्यांनी 'ॐ शान्ति' असे ट्वीट करत नट्टू काका यांचा फोटो ट्विटरवर शेअर करत चाहत्यांना ही दु:खद बातमी दिली.बागासोबत जेठालाल गडाच्या दुकानात काम करणाऱ्या नट्टू काका यांचे आयुष्य 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेमुळे बदलले होते. 'नट्टू काका' यांचे नाव घनश्याम नायक, मात्र शेवटपर्यंत ते कुठेही दिसले तरी लोक त्यांना नट्टू काका याच नावाने हाक मारत होते. गेल्या 55 वर्षापासून ते इंडस्ट्रीमध्ये सक्रिय होते.
घनश्याम नायक यांनी जवळपास 350 हून अधिक टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. यात हिंदी मालिकांसह अन्य भाषांमधील मालिकांचाही समावेश आहे. तसेच त्यांनी बॉलिवूडमध्येही हात आजमावला आहे. सलमान खान याच्या 'हम दिल दे चुके सनम', 'तेरे नाम' यासारख्या सुपरहिट चित्रपटातही काम केले आहे. तसेच चोरी चोरी' आणि 'खाकी' या चित्रपटातही त्यांची छोटी भूमिका होती. तसेच नसीरुद्दीन शाह यांच्या 'मासूम' या चित्रपटात त्यांनी बालकलाकार म्हणूनही काम केले होते.
एका मुलाखतीमध्ये त्यांनी इंडस्ट्रीतील आपला संघर्ष उघड केला होता. एकेकाळी मी फक्त 3 रुपयांमध्ये 24 तास काम करायचो. त्याकाळी इंडस्ट्रीमध्ये कामाचे जास्त पैसे मिळत नव्हते. पण मला कलाकारच बनायचे होते. अनेकदा मुलांच्या शाळेची फी भरण्यासाठीही पैसे नसायचे. अशावेळी शेजारी राहणारे आणि मित्र यांच्याकडे हात पसरावे लागत होते, असे घनश्यान नायक यांनी सांगितले.