प्रेस मीडिया वृत्तसेवा :
मुंबई : ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटीने १७.१७ टक्के भाडेवाढ लागू केल्यानंतर आता खासगी वाहतूकदारांनीही अव्वाच्या सव्वा भाडेवाढ केली आहे.इंधन दरवाढीचे कारण देत खासगी वाहतूकदारांनी केलेल्या मनमानी दरवाढीवर परिवहन विभागाचे दुर्लक्ष होत आहे. एसटीच्या तिकीट दराच्या तुलनेत दीडपट दर आकारण्याचीच परवानगी न्यायालयाने दिली असताना त्याहून अधिक तिकीट आकारले जात आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवासीसंख्या घटल्याने एसटीला तोटा सहन करावा लागत आहे. दुसरीकडे अनधिकृतपणे खासगी वाहतूकदार टप्पा वाहतूक करत प्रवासी वाहतूक करत आहे. दिवाळीतील गर्दीच्या हंगामाच्या तोंडावर विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचारी संघटना २७ ऑक्टोबरपासून बेमुदत उपोषणावर जाणार असल्याने खासगी वाहतूकदारांचे चांगलेच फावणार आहे. मुंबई, पुण्याहून औरंगाबाद, नागपूर, कोल्हापूर आणि कोकणात धावणाऱ्या खासगी वाहतूकदारांनी दुप्पट ते तिप्पट भाडेवाढ केली आहे. रेल्वेचे आरक्षण संपल्याने अखेरच्या टप्प्यात खासगी वाहतुकीशिवाय पर्याय नसल्याने प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
परिवहन विभागाचे दुर्लक्ष
सणासुदीच्या काळात खासगी वाहतूकदारांनी न्यायालयाने ठरवून दिलेल्या भाड्यापेक्षा जास्त भाडे आकारणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश राज्य परिवहन आयुक्तांनी दिले आहे; मात्र तिप्पट भाडेआकारणी प्रकरणी तक्रार करण्यासाठी परिवहन विभागाची कुठलीही व्यवस्था उपलब्ध नाही. त्यामुळे एसटीचे खासगी प्रवासी वाहतूकदारांकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.
मार्ग - नियमित दर -वाढीव दर
पुणे- गोवा - १३०० - ३०००
पुणे - अहमदाबाद - १२०० - ४०००
पुणे - इंदूर - १६०० - २६००
पुणे - हैदराबाद - १३०० - ३०००
पुणे - नागपूर - १२०० - २५००