प्रेस मीडिया वृत्तसेवा :
मुंबई | एनसीबी अर्थात अंमली पदार्थ विरोधी पथकाने कार्डेलिया क्रुझवर कारवाई करत शाहरूख खानच्या मुलाला ताब्यात घेतलं. या प्रकरणावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत असताना काँग्रेसने मात्र एनसीबीवर निशाणा साधलाय.काँग्रेस नेत्या आणि राष्ट्रीय प्रवक्त्या शमा मोहम्मद यांनी एनसीबीचे अधिकारी छोट्या माशात व्यस्त असल्याची टीका केली आहे.
'शमा मोहम्मद यांनी ट्वीट करत एनसीबीवर गंभीर आरोप केलेत. क्रुझवरच्या छोट्या माशांना अटक करण्यातच एनसीबी व्यस्त होती. पण जेव्हा सगळ्यात मोठ्या माशाची गोष्ट येते, अदानीच्या मुंद्रा बंदरावरून 3000 किलो हेरोईनची तस्करी झाली तेव्हा मात्र एनसीबी पुर्णपणे शांत होती. एनसीबी संघटित ड्रग्ज कार्टेलच्या किंगपिन्सचं का संरक्षण करत आहे आणि कुणाच्या आदेशावरून,' असं ट्वीट शमा मोहम्मद यांनी केलंय.
गुजरातच्या कच्छ जिल्ह्यात असणाऱ्या अदानींच्या या मुंद्रा बंदरावर महसूल गुप्तचर संचलनालयाने अर्थात डीआरआयने छापा टाकला होता. 16 सप्टेंबर रोजीच्या या छाप्यात मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला होता. दोन कंटेनरमध्ये टाल्क स्टोनच्या आच्छादनाखाली जवळपास 3000 किलोचं हेरोईन ड्रग सापडलं होतं. अदानी समूहाच्या बंदरावर एवढ्या मोठ्या प्रमाणात ड्रग्ज सापडल्याने एकच खळबळ उडाली होती.
मुंद्रा बंदरावरून वाहतूक होणारे कंटेनर आणि कार्गो जहाजांची तपासणी करण्याचे अधिकार आम्हाला नाहीत. बंदर चालवणारी कंपनी फक्त वाहतूकीचं नियोजन करत असल्याचं स्पष्टीकरण अदानी समूहाकडून देण्यात आलं होतं. पण आता कार्डेलिया क्रुझवर झालेल्या कारवाईत व्यस्त असलेल्या एनसीबीने अदानींच्या बंदरावर सापडलेल्या ड्रग्जकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.