प्रेस मीडिया वृत्तसेवा :
मुंबई – दिवाळीच्या उत्सवासाठी राज्य सरकारकडून नियमावली जाहीर करण्यात आली आहे.अवघ्या काही दिवसांवर दिवाळीचा सण आला आहे. या पार्श्वभूमीवर संभाव्य गर्दी किंवा गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता राज्य सरकारकडून खबरदारी घेण्यात येत आहे.
एकीकडे दुसरी लाट ओसरत असताना करोनाची रुग्णसंख्या नियंत्रणात आल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे लसीकरण देखील व्यापक प्रमाणावर सुरू असल्यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणावर निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत.
सिनेमागृह आणि नाट्यगृहांसोबतच दिवाळी पहाटसारख्या कार्यक्रमांना देखील परवानगी देण्यात आली आहे. मात्र, तरीदेखील तिसऱ्या लाटेची भिती आणि गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता राज्य सरकारने दिवाळी सणासाठी नियमावली जाहीर केली आहे.
दिपावलीच्या उत्सवादरम्यान मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची आतिषबाजी केली जाते. त्यामुळे वायू आणि ध्वनीप्रदूषणाची पातळी वाढून लोकांच्या आणि प्राण्यांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होतात. करोना झालेल्या किंवा होऊन गेलेल्या नागरिकांना फटाक्यांच्या धुरामुळे त्रास होण्याची भिती आहे. त्यामुळे नागरिकांनी फटाके फोडण्याचं टाळून दिव्यांची आरास करून उत्सव साजरा करावा, अशी सूचना करण्यात आली आहे.
तसेच दिवाळी पहाटसारख्या कार्यक्रमांना परवानगी देतानाच त्यासाठी आवश्यत ती नियमावली देण्यात आली आहे. या नियमावलीचे काटेकोर पालन होईल, याची दक्षता घेण्यात यावी. शक्यतो असे कार्यक्रम ऑनलाईन, केबल नेटवर्क किंवा फेसबुक लाईव्ह अशा माध्यमातून करण्यात यावेत, असेही नमूद करण्यात आले आहे.