राज्य सरकारने दुकाने रात्री 11 वाजेपर्यंत तर हॉटेल्स 12 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मंगळवारी मान्यता दिली



प्रेस मीडिया वृत्तसेवा :

सणासुदीच्या काळात दुकाने तसेच रेस्टॉरंटमध्ये गर्दी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन राज्य सरकारने दुकाने रात्री 11 वाजेपर्यंत तर हॉटेल्स 12 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मंगळवारी मान्यता दिली.यामुळे दुकाने व हॉटेल व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

नाटय़गृहे आणि चित्रपटगृहे शुक्रवार, 22 ऑक्टोबरपासून सुरू केली जाणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर उपाहारगृहांची वेळदेखील वाढवण्याची मागणी करण्यात आली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झालेल्या टास्क फोर्सच्या बैठकीत दुकाने, रेस्टॉरंटस् तसेच अॅम्युझमेंट पार्कसंदर्भात निर्णय घेण्यात आला. त्यानुसार दुकाने व रेस्टॉरंटबाबत नियमावली मंगळवारी जारी करण्यात आली असून तत्काळ हा निर्णय लागू करण्यात आला असल्याचे या नियमावलीत म्हटले आहे. राज्यातील सर्व उपाहारगृहे, हॉटेल्स रात्री 12 वाजेपर्यंत तर सर्व प्रकारची दुकाने रात्री 11 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास राज्य शासनाने परवानगी दिली आहे. वेळमर्यादा ठरविण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला देण्यात आले असले तरी मुंबई, ठाणे, पुणे या मोठय़ा शहरांमध्ये रात्री 12 पर्यंत व्यवहार खुले ठेवण्यास मुभा दिली आहे.

कोरोनाचे इतर निर्बंध लागू

कोरोनासंदर्भात लागू असलेली मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन नागरिकांना आणि आस्थापनांना करावे लागणार आहे. पूर्णपणे लसीकरण, गर्दीच्या क्षमतेवर निर्बंध हे परिस्थितीनुसार लागू राहणार आहेत. वेळेव्यतिरिक्त पूर्वी लावलेल्या निर्बंधांमध्ये कोणतीही सवलत देण्यात आलेली नाही.

Post a Comment

Previous Post Next Post