प्रेस मीडिया वृत्तसेवा :
मुंबई : आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात पंच असलेल्या प्रभाकर साईलने माध्यमांसमोर येत धक्कादायक खुलासे केले आहेत. प्रभाकर साईलने एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यासह किरण गोसावींवर अनेक गंभीर आरोप केले होते.साईलने आर्यन खान प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप केला आहे. यासाठी २५ कोटी रुपयांची डील झाली. त्यातील ८ कोटी रुपये एनसीबीचे विभागीय प्रमुख समीर वानखेडे यांना मिळणार असल्याचाही दावा प्रभाकर साईलने केला होता. यावेळी त्याने सॅम या व्यक्तीचे नाव घेतले होते. त्याबाबत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
'भाजपाचे नेते जे ईडीचा खेळ करत आहे ना त्यांनी या प्रकरणातसुद्धा मनी लॉन्ड्रिंग झाले आहे. मी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती बाजूला बसलेली आहे ती सॅम डिसूझा आहे. तो मुंबईतील मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातील सर्वात मोठा खेळाडू आहे. तो मोठे राजकारणी, नेते, अधिकारी सर्वाचे मनी लॉन्ड्रिंग करतो असे म्हटले जाते. तो तिथे का बसला आहे? हा मोठा खेळ आहे,' असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
'जो साक्षीदार आहे त्याला काहीही होऊ देणार नाही. याप्रकरणाची संबंध फक्त मुंबईतच नाही तर दिल्लीपर्यंत पोहोचले आहेत. प्रभाकर साईलने खुलासे करुन देशावर मोठे उपकार केले आहेत. जे देशभक्तीच्या नावाखाली याप्रकारचे काम करतात त्यांना उघड करण्याचे काम त्याने केले आहे. आतापर्यंत नवाब मलिक यांनी काही गोष्टी पुढे आल्या आहेत. मध्यातरानंतर मी खुलासे करणार आहे,' असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
'याची सीबीआय चौकशी झाली पाहिजे. अजून १० व्हिडीओ तुम्हाला मिळतील. भाजपाचे किती लोक या प्रकरणामध्ये आहेत हे तुम्हाला कळेल. किरण गोसावी कुठे आहे भाजपाला माहिती असेल. महाराष्ट्राला बदनाम करण्याची एकही संधी या लोकांनी सोडलेली नाही. एनसीबीच्या कार्यालमध्ये बसलेल्या सॅम डिसूझाचे नाव मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात येते. माझी मागणी आहे याची चौकशी करावी,' असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.