प्रेस मीडिया वृत्तसेवा :
मुंबई - भाजपनेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या मागील काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांच्या मागे हात धुवून लागले आहेत. अनेक नेत्यांवर त्यांनी आरोप केले आहेत.यापैकी बहुतेक नेत्यांच्या मागे ईडीची चौकशी लागली आहे. मात्र आता एक धक्कादायक माहिती समोर येत असून परिवहनमंत्री अनिल परब यांच्यामागे लागलेल्या चौकशीच्या फेऱ्यासाठी शिवसेनेच्या माजी मंत्र्याचा हात असल्याचा आरोप कऱण्यात आला आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ता प्रसाद कर्वे परब यांच्याविरोधात किरीट सोमय्यांना सगळी माहिती पुरवतो, कारवाईसाठी पाठपुरावा करतो आणि मग हाच कार्यकर्ता संपूर्ण माहिती माजी मंत्री रामदास कदम यांना पुरवतो. अनिल परब यांच्या दापोलीतील रिसॉर्टविरोधातही रामदास कदम यांनीच सोमय्यांना रसद पुरवल्याचा आरोप करण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम यांनी हे आरोप केले आहेत. या संदर्भातील एक ऑडियो क्लिप व्हायरल झाली आहे. तर रामदास कदम यांनी संजय कदम यांचे आरोप फेटाळले आहेत.
दरम्यान समोर आलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये प्रसाद कर्वे आणि किरीट सोमय्यांचा संवाद आहे. अनिल परब यांचं वांद्र्यातलं कार्यालय अनधिकृत असून ते पाडण्यात येणार आहे. न्यायालयानं तसे आदेश दिलेत, असा दोघांमधला संवाद आहे. या आदेशाची प्रत कधी मिळेल अशी विचारणा कर्वे करतात. त्यावर दोन दिवसांत मिळेल, असं उत्तर सोमय्यांनी दिलं आहे.
यानंतर हे संभाषण कर्वे रामदास कदमांच्या कानावर घालतात. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यावर त्यांना (अनिल परब) राजीनामा द्यावा लागेल, असं कदम म्हणतात. मनसेचे नेते आणि खेड नगर परिषदेचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी या ऑडिओ क्लिप पुढे आणल्या आहेत.