प्रेस मीडिया वृत्तसेवा :
एनसीबीच्या अधिकाऱ्यांचे मीडिया नियोजन इतके चांगले आहे हे माहीत नव्हते. सतत काही ना काही पुडय़ा सोडायच्या… कुणाला तरी बदनाम करायचं… धाकदपटशा करायला सांगायचे… लोकं म्हणतात की, लांब राहा यांच्यापासून… एखादा माणूस तुमच्या खिशात पुडी टाकेल आणि तुम्हाला अटक करून टाकेल… इतक्या थराला केंद्र सरकारची ही यंत्रणा पोहोचली आहे.'अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अमली पदार्थ प्रतिबंधक विभागासह (एनसीबी) सर्व केंद्रीय यंत्रणांवर आज हल्ला चढवला.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी केंद्रीय तपास यंत्रणांचा भाजपकडून सातत्याने गैरवापर होत असल्याचा घणाघात केला. त्यात एनसीबीसह सीबीआय, सक्तवसुली संचालनालय (ईडी), आयकर विभाग (आयटी) या यंत्रणांचा समावेश असल्याचे ते म्हणाले. या सगळ्या यंत्रणांचा वापर राजकीय हेतूने केला जात असल्याचे चित्र देशात दिसत आहे, असे ते पुढे म्हणाले.
काही लोकांना आणि पक्षांना बदनाम केले जातेय
काही लोकांना आणि पक्षांना बदनाम करण्याची खबरदारी घेतली जात असल्याचा आरोपही शरद पवार यांनी यावेळी केला. 'नवाब मलिक यांनी एका व्यक्तीविषयी भूमिका मांडली. मी त्याची थोडी माहिती घेतली. समीर वानखेडे हे अधिकारी याआधी एअर फोर्सवर एक्साईज विभागात होते. तिथेही काही कथा मला ऐकायला मिळाल्या. पण त्याविषयी पूर्ण माहिती नसल्यामुळे मी त्यावर भाष्य करत नाही.
या प्रकरणात दोन एजन्सी आहेत. एक एनसीबी आणि दुसरी मुंबई पोलीस. गेल्या काही वर्षांत केंद्राच्या एजन्सींनी केलेल्या रिकव्हरीचे प्रमाण अतिशय कमी आहे. कुठे पुडी… कुठे काय… कुठे काही ग्रॅम वगैरे. याउलट मुंबई पोलिसांनी केलेल्या जप्तीचं एकूण प्रमाण हे केंद्राच्या एजन्सीपेक्षा कितीतरी अधिक आहे. त्यामुळे केंद्राची मुंबईतील एजन्सी काहीतरी करतो असे दाखवण्यासाठी काम करते की काय अशी शंका हे प्रमाण पाहिल्यानंतर येते.
भाजप नेत्यांनी हे कॉण्ट्रक्ट कधी घेतले?
'ड्रग्ज पार्टी प्रकरणात काही लोक पकडले आहेत. कुठेही गुन्हा घडला तर पोलीस आधी पंचनामा करतात. अधिकारी करत असलेली कारवाई योग्य आहे याची खात्री वाटावी अशा पद्धतीचे हे पंच असायला हवेत. पण जे कोण गोसावी होते, ते गेले काही दिवस फरारी आहेत का काय माहिती नाही. पंच म्हणून निवड केलेली व्यक्ती समोर यायला तयार नाही. याचा अर्थ त्यांची नैतिकता संशयास्पद दिसत आहे' असे शरद पवार म्हणाले. नार्कोटिक्स एजन्सीच्या वरिष्ठ अधिकाऱयांनी अशा व्यक्तींची पंच म्हणून निवड केली, याचा अर्थ या अधिकाऱयांचे संबंध कोणत्या प्रकारच्या लोकांशी आहेत हे त्यातून स्पष्ट होते असाही टोला त्यांनी लगावला. अशा प्रकारात आरोप केल्यानंतर त्यावर खुलासा करण्यासाठी सगळ्यात आधी भाजपचे नेते होते. मला कळेना की ही जबाबदारी, हे कॉण्ट्रक्ट भाजपच्या नेत्यांनी कधी घेतले? असा खोचक सवालही पवार यांनी केला.
यंत्रणेच्या गैरवापराचे समर्थन करताहेत
खुलासा करायला केवळ राज्यातलेच नेते येतात असे नाही. एका ठिकाणी छापे टाकले, त्याबाबत एक विधान एका केंद्रीय राज्यमंत्र्याचं होतं की, हे आमचंच काम आहे. मला माहिती नव्हते. सरकारमध्ये काम केलं आहे मी. पण हे आमचंच काम असतं असं सांगत त्यांनी आमच्या ज्ञातात भर टाकली. ते मला कुठे भेटले तर जाहीरपणे आभार मानेन त्यांचे. पण मुद्दा हा आहे की, शासकीय यंत्रणेकडून सत्तेचा गैरवापर होत असेल तर त्याचं समर्थन करताना भाजपचे लोक दिसताहेत, असे सांगत त्यांनी भाजप नेत्यांच्या समर्थनाबद्दल आश्चर्य व्यक्त केले.
असे कधी घडले नव्हते!
'महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याबद्दल तेव्हाच्या मुंबई पोलीस आयुक्तांनी काही आरोप केले होते. त्या आरोपांमुळे निर्माण झालेल्या वातावरणामुळे अनिल देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला. ज्यांनी आरोप केले ते गृहस्थ आता कुठे आहेत याचा पत्ता लागलेला दिसत नाही. पण एक जबाबदार अधिकारी जबाबदार मंत्र्यांबाबत बेछूट आरोप करतो हे चित्र कधी घडलं नव्हतं. अनिल देशमुखांनी यावर सत्तेपासून बाजूला होण्याची भूमिका घेतली. दुसऱया बाजूला ज्यांनी आरोप केले ते गृहस्थ गायब झाले हा फरक आहे.' असे शरद पवार म्हणाले.
सत्तेतील तीनही पक्ष टार्गेट
'केवळ राष्ट्रवादी नाही तर सत्तेतील तिन्ही पक्षांना टार्गेट केले जात आहे. सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न दोन वर्षं केल्यानंतर सरकारमधील लोकांच्या जवळच्या व्यक्तींना नाउमेद करावे, भीती दाखवावी, हल्ले करावेत अशा प्रकारचे धोरण स्वीकारलेले दिसत आहे. अशोक चव्हाण यांच्या सहकाऱयांवर हल्ला झाला होता, मात्र अशोक चव्हाण यांच्यावर हल्ला झालेला नव्हता. अजित पवार यांच्यावर आयकर विभागाने थेट न जाता त्यांच्या जवळच्या लोकांना लक्ष्य केले आहे. मंत्री सुभाष देसाई यांच्या चिरंजीवांच्या जवळच्या लोकांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न झालेला दिसतो. अशा गोष्टी फार घडल्या आहेत. त्याबद्दल चिंता करण्याचं कारण नाही.' असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.
जयंत पाटलांच्या चिरंजीवांचा आयफेल टॉवरवर मुलीला प्रपोज
शरद पवार यांनी पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच प्रदेशाध्यक्ष मंत्री जयंत पाटील यांच्या मुलाची बातमी दिली. 'आमच्या प्रदेशाध्यक्षांच्या चिरंजीवाची ही बातमी आहे. आमचा सर्वांचा दृष्टिकोन किती व्यापक झाला आहे बघा. जयंत पाटलांच्या चिरंजीवांनी काल संध्याकाळी पॅरिसमध्ये आयफेल टॉवरवर जाऊन एका मुलीला प्रपोज केला. त्याला दोन्ही बाजूंनी मान्यता मिळवली. आता आम्ही वाळवास इस्लामपूरपर्यंत सीमित नाही आहोत. आम्ही एकदम पॅरिस वगैरेला जातो. ठिकाण इंटरनॅशनल असेल, पण दोन्ही मुलं मुली डोमेस्टिक आहेत. स्थानिक आहेत. त्यामुळे त्यांचं लग्न इथंच होईल, असे सांगतानाच आता आम्हाला काळजी घ्यावी लागेल. आमची मुलं कुठं जाऊन काय करतील हे सांगता येत नाही' असे पवार यांनी सांगताच हशा पिकला.
अनिल देशमुखांच्या घरी छापा टाकण्याचा विक्रम
अनिल देशमुखांच्या घरी पाचव्यांदा छापा घातला गेला. एकाच घरात पाच वेळा जाऊन पुनः पुन्हा काय मिळते. पण त्यांनी तो विक्रम केला हे मान्य केले पाहिजे अशी खिल्लीही शरद पवार यांनी उडवली. पाच वेळा एखाद्याच्या घरी जाणं हे कितपत योग्य आहे याविषयीचा विचार करण्याची गरज असल्याचे शरद पवार म्हणाले.
पाहुण्यांनी अजीर्ण होईल इतका पाहुणचार घेऊ नये
अजित पवारांच्या बहिणींच्या घरांवर आयकर छाप्यांविषयी विचारले असता शरद पवार म्हणाले, 'यासंदर्भात अजित पवार चौकशी थांबल्यानंतर बोलेन असे म्हणालेत. पण चौकशी अजून सुरू आहे. असे पाहुणे अनेक ठिकाणी येतात. एक-दोन-तीन दिवस असतात. पण आजचा सहावा दिवस आहे. पाहुणचार घ्यावा. पण अजीर्ण व्हावे इतका पाहुणचार घेऊ नये,' असा टोला शरद पवार यांनी लगावला.
तिन्ही मुलींचा कारखाना नाही. ते तिथे गेले. काही चौकशी करायची होती ती केली. एक-दीड दिवसाने चौकशी संपली. काम संपल्यानंतर त्यांना जायची घाई होती. पण त्यांना सारखे फोन येत होते - थांबा, इतक्यात सोडू नका. नंतर त्यांना आमच्या मुलींनीच विचारलं की तुमचे घरचे वाट बघत असतील. तेव्हा ते म्हणाले की, आम्हाला निर्देश आहेत की सांगितल्याशिवाय घर सोडायचं नाही.