प्रेस मीडिया वृत्तसेवा :
कोल्हापूर : महाविकास आघाडी सरकारने पुकारलेल्या 'महाराष्ट्र बंद'ला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ऐन नवरात्रोत्सवाच्या धामधुमीत कोल्हापूरकरांनी दिवसभर आपापले दैनंदिन व्यवहार कडकडीत बंद ठेवून, शेतकऱयांप्रति संवेदना व्यक्त केल्या.कोल्हापूर जिल्हा शिवसेनेच्या वतीने पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील पंचगंगा नदी पुलावर महामार्ग रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी महामार्गाच्या दोन्ही बाजूला वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन, नंतर सोडून दिले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली करवीर तालुकाप्रमुख राजू यादव, सुजित चव्हाण, अवधूत साळोखे, शिवाजी जाधव, मंजित माने आदी उपस्थित होते. ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून कँडल मार्च काढत लखीमपूर घटनेवरून घोषणाबाजी करण्यात आली. बळी गेलेल्या शेतकऱयांना ऐतिहासिक बिंदू चौकात श्रद्धांजली वाहून, भाजपचा तीव्र निषेध करण्यात आला.
जयसिंगपूर शहरातील गांधी चौक, क्रांती चौक आदी मुख्य भागात बंदमुळे शुकशुकाट होता. सकाळी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यापाशी झालेल्या निषेध सभेत आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्यासह शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसच्या पदाधिकाऱयांकडून लखीमपूर घटनेवरून टीकेची झोड उठविण्यात आली.