प्रेस मीडिया वृत्तसेवा :
इचलकरंजी ता. १७ गेली दोनवर्षं जगभर कोरोनाच्या अभितपूर्व संकटामुळे मानवी जीवन भयभीत व विस्कळीत झाले आहे. फार मोठी जीवित व वित्त हानी झाली आहे. या संकटामुळे लाखो व्यक्तींना मानसिक,आर्थिक,सांस्कृतिक अशा विविध आव्हानांशी मुकाबला करावा लागतो आहे.जीवनातील हा संघर्ष योग्य तऱ्हेने पेलायचा असेल तर त्यासाठी वाचन हे सर्वोत्तम उपयुक्त साधन .लॉकडाऊनमुळे वाचन संस्कृती टिकवून ठेवण्यात व ती विकसित करण्यात मोठा अडथळा निर्माण झाला आहे.अशावेळी प्रत्येक सुशिक्षित नागरीक बंधू भगिनींनी सार्वजनिक वाचनालयाचे वाचक - सभासद होऊन होऊन वाचन संस्कृती विकसित केली पाहिजे. त्याद्वारे आपले कुटुंब, समाज व राष्ट्र बलशाली करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.तीच कालवश डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम आणि श्रीमंत गोविंदराव उर्फ आबासाहेब घोरपडे यांना खरी आदरांजली ठरेल असे मत समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी यांनी व्यक्त केले.ते प्रबोधन वाचनालयाच्या वतीने अयोजित कार्यक्रमात बोलत होते.प्रारंभी माजी राष्ट्रपती व जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ कालवश डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या नव्वदाव्या जन्मदिना निमित्त आणि इचलकरंजीचे जहागीरदार श्रीमंत गोविंदराव उर्फ आबासाहेब घोरपडे यांच्या तिसऱ्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमांना निवृत्त मुख्याध्यापक प्रल्हाद मेटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
प्रसाद कुलकर्णी म्हणाले इचलकरंजीचे जहागीरदार श्रीमंत गोविंदराव उर्फ आबासाहेब घोरपडे हे अतिशय दानशूर,निर्मोही व राजस व्यक्तिमत्व होते.त्यांनी अनेक शिक्षण संस्था,सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थाना ,उपक्रमांना सातत्यपूर्ण मदत केली होती.तोच वारसा त्यांचे सुपुत्र श्रीमंत यशवंतराव घोरपडे पुढे नेत आहेत. तीनशेहून अधिक वर्षाचा संपन्न इतिहास असलेल्या श्रीमंत घोरपडे घराण्याने लोकसेवेचे केलेले काम फार मोठे आहे. इचलकरंजी आणि परिसराच्या जडणघडणीत राजघराण्याचे मौलिक स्वरूपाचे योगदान आहे.तीच दूरदृष्टी घेऊन श्रीमंत बाबासाहेब सहा - सात दशके कार्यरत राहिले.यावेळी निवृत्त मुख्याध्यापक प्रल्हाद मेटे यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रा.रमेश लवटे, अन्वर पटेल,प्रा.डॉ.राज पटेल,गजानन जासूद,सौदामिनी कुलकर्णी, नंदा हालभावी ,अरुण जाधव, ओंकार पाटील आदी उपस्थित होते.यावेळी मान्यवरांच्या हस्ते ' प्रबोधन प्रकाशन ज्योती ' मासिकाच्या 'ऑक्टोबर २०२१'अंकाचे प्रकाशनही करण्यात आले.