प्रेस मीडिया वृत्तसेवा :
इचलकरंजी : जुलै 2021 मध्ये इचलकरंजी शहर व परिसरामध्ये आलेल्या महापूरामुळे पूर परिसरातील यंत्रमागधारक, व्यापारी, इतर उद्योजक व दुकानदार यांचे अतोनात नुकसान झाले. या सर्वांना राज्य शासनाने नुकसान भरपाईची घोषणा केली होती. त्यानुसार नुकसानीचे पंचनामे झाले. परंतू पूर परिसरातील अनेक यंत्रमागधारक, व्यापारी, इतर उद्योजक व दुकानदार यांची नांवेच यादी मध्ये नाहीत किंवा पूरग्रस्त लोकांना मिळालेली मदत तुटपूंजी आहे, यासंदर्भात दि इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशन मध्ये आमदार प्रकाश आण्णा आवाडे, जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहूल आवाडे साहेब व अप्पर तहसिलदार शरद पाटील यांच्या उपस्थितीत पूरग्रस्त यंत्रमागधारक, व्यापारी, इतर उद्योजक व दुकानदार यांची बैठक पार पडली.
काही कारणास्तव पूरग्रस्त नागरिक आणि उद्योग, व्यवसायांना मदत मिळालेली नाही किंवा मिळाली ती मदत अत्यंत तुटपुंजी आहे. म्हणून शासन दरबारी पाठपुरावा करुन त्रुटी दूर करुन सर्वांनाच नुकसान भरपाई देण्यासाठी प्रयत्न करु. शॉप अॅक्ट असो किंवा नसो सर्वांनाच मदत मिळवून दिली जाईल. कोणीची अनुदानापासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही आमदार प्रकाश आण्णा आवाडे यांनी बोलताना दिली.
आमदार प्रकाशआण्णा आवाडे म्हणाले, महापूरामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. यावर्षी पाणी पातळीत गतीने वाढ झाली, पण ते अत्यंत संथगतीने ओसरले. इचलकरंजीसह चंदूर, रुई भागातही महापूराचा फटका बसला. सर्वांनाच नुकसान भरपाई मिळावी यासाठी आपण आग्रही होतो. त्याला अप्पर तहसिलदार शरद पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. नुकसानग्रस्त भागातील पंचनामे झाले, यादी तयार झाली. परंतु शॉप अॅक्ट नाही म्हणून काहीजणांना तर पंचनामा होऊनही यादीत नांव नसल्याने काहीजणांना नुकसान भरपाई मिळाली नाही. अशा सर्वांनाच नुकसान भरपाई मिळणार आहे. त्यासाठी आपल्याकडे काही पुरावा, फोटो असेल त्यासोबत अर्ज करावा. कोणीही मदतीपासून वंचित राहणार नाही. एकाच ठिकाणी जादा युनिट असतील त्या संदर्भातील कागदपत्रे सादर करावीत. शासन दरबारी आदेशात काही सुधारणा करण्याची गरज असेल तर आपण त्यासाठी पाठपुरावा करु आणि दिवाळीच्या आत सर्वांना मदत मिळवून देऊ आणि अधिकाधिक कसे मिळेल यासाठी प्रयत्न करु. पंचनामे करताना काही त्रुटी झाल्या असतील, पण त्यामध्ये सुधारणा करुन जे वंचित आहेत त्यांची फेरतपासणी करुन मदत मिळवून दिली जाईल.
याप्रसंगी पॉवरलूम असोशिएशनचे अध्यक्ष सतिश कोष्टी, माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब कलागते, अहमद मुजावर, पॉवरलूम असोशिएशनचे व्हा. चेअरमन दत्तात्रय कनोजे, चंद्रकांत पाटील, रफिक खानापुरे, नारायण दुरुगडे, सोमाण्णा वाळकुंजे आदी उपस्थित होते.